‘सांग नेहा, महाभारत कुणी लिहिलं?

‘दादा, तेव्हढं माहीत आहे- गणपतीबाप्पाने!’

NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

‘वेडे, मुळात व्यासांनी सांगितलं तेव्हा गणपतीने लिहिलं ना?’

‘पण मग तू प्रश्न बरोबर का नाही विचारलास?’

‘तू ना, अगदी ‘झीरो’ आहेस ‘झीरो’! अगदी शून्य.. या डोशासारखी राऊंड!’

‘माहीत आहे तू नेहमी वर्गात टॉपर असतोस ते. म्हणून काही एवढी ‘हीरोगिरी’ नको करायला. झीरोदेखील एक ते नऊ  आकडय़ाइतकाच महत्त्वाचा असतो. शून्य नसेल तर काय होईल? नऊच्या पुढे गाडीच अडेल. नऊ नंतर पुन्हा एकापुढे शून्य लिहिल्यावरच गाडी हलते. मग एकाचे दहा, शंभर, हजार, लाख, कोटी होतात. झीरो ज्याच्याबरोबर असतो, त्याचा भाव दसपटीने वाढतो. तू ‘दादा’ असलास, तरी तुझ्याबरोबर मी असते तेव्हा तुझा भाव वाढतो. बहीण असेल तर भावाला भाव. एकटय़ा मुलाला कोण विचारतोय? रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही. बहीण महत्त्वाची.. अगदी ‘झीरो’ असली तरी, झीरोइतकीच महत्त्वाची!’

‘याचाच अर्थ, बरोबर कुणी नसेल तर एकटय़ा शून्यालादेखील किंमत नाहीच. एकाचं तसं नसतं. पहिल्याचं महत्त्व कायम असतं. सांग बघू, चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं?’

‘अं.. नील आर्मस्ट्राँगनं!’

‘अन् दुसरं कुणी ठेवलं? आठवतंय नाव?’

‘अरे, नील आर्मस्ट्राँगनेच! तो काय चंद्रावर एका पायावरच उभा राहिला होता का? त्याने दुसरं पाऊल ठेवलं म्हणून तो चंद्रावर चालू शकला ना?’

नेहाच्या या ‘नंबर वन’ उत्तरावर, इतका वेळ ईशान-नेहा या बहीण-भावंडांचा संवाद ऐकत डायनिंग टेबलाशी बसलेल्या बाबांना, आजीला अन् स्वयंपाकओटय़ाशी डोसे करणाऱ्या आईलादेखील हसू आवरेना. रविवार सकाळचा निवांतपणा असल्यामुळे, गरमागरम डोसे प्रत्येकाच्या ताटलीत पडत होते. अन् डोशाची ‘टर्न’ येता येता भावाबहिणीच्यात ‘प्रेमळ’ प्रश्नोत्तरं चालली होती.

नेहाच्या उत्तरावर ईशान खरं तर ओशाळला. मग बाबाच म्हणाले, ‘बघ ईशान, पहिला नंबर नसेल तिचा, लेकीन नेहा का भी जवाब नहीं! बिकॉज कॉमन सेन्स इज अनकॉमन! म्हणून पहिल्या नंबराने नंतरच्या अंकांना.. अगदी शून्यालादेखील कधी कमी नाही लेखायचं.’

‘पण बाबा, मी तिला काय चुकीचं विचारलं?’

‘अरे, चंद्रावर उतरणारा दुसरा माणूस कोण, असं नको का विचारायला?’

‘ओके. ओके. बरं मग ते तरी सांग, नेहा.. आठवतंय नाव?’

‘अं, अं.. नाही आठवत.’

‘बघ, म्हणजे पहिला नेहमी लक्षात राहतो, नंतरचे विसरले जातात. म्हणून पहिल्याचं महत्त्व नेहमीच जास्त! पण माझ्या लक्षात आहे त्याचंसुद्धा नाव.. एडविन ऑल्ड्रिन.’

‘करेक्ट ईशान, पण तो लगेच आर्मस्ट्राँगपाठोपाठ चंद्रावर उतरला होता का?’ बाबांनी विचारलं.

‘म्हणजे काय? असणारच.. म्हणजे उतरला होताच.’

‘चांद्रयान चंद्रावर उतरल्यावर सहा तासांनी आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला, नंतर वीस मिनिटांनी एडविन ऑल्ड्रिन उतरला. दोघं सव्वादोन तास चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत होते. त्यांच्या सगळ्या हालचाली, तिकडचे पृष्ठभागाचे नमुने गोळा करणं, पुन्हा यानात परत येणं, हे सगळं आधीच ठरलेलं होतं. त्यांच्या या अंतराळ यानाचं नाव होतं ‘ईगल’ अन् मोहिमेचं नाव होतं अपोलो-११. ते दोघंही जवळपास एकवीस तास चंद्रावर होते. बरं ईशान, एक सांगा, आर्मस्ट्राँग अन् ऑल्ड्रिन हे दोघेच चंद्रावर गेले होते, की यांच्याबरोबर आणखी कुणी होतं?’

‘नाही माहीत.. नो आयडिया.’

गरमागरम डोसा आजीच्या ताटलीत वाढता वाढता आईच म्हणाली, ‘त्यांच्याबरोबर त्या मोहिमेत मुख्य पायलट होता मायकेल कॉलिन्स!’

‘माय गॉड! आई तू..!’ ईशान अन् नेहा दोघं एकदम उदगारले.

‘का? मीदेखील अगदी ‘झीरो’ आहे का?’ आई हसत म्हणाली.

‘नाही, म्हणजे आम्हाला वाटायचं बाबांनाच सगळं नॉलेज आहे..’

ईशानने हळूच बाबांना डोळा मारलेला आईच्या नजरेतून सुटला नाही. त्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, ‘नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरणारा पहिला माणूस म्हणून अजरामर झालाच. त्याच्यामुळे इतिहास घडला. पण या नंबर वनची कामगिरी दसपट करणारा एडविन ऑल्ड्रिन तितकाच महत्त्वाचा. तर मायकेल कॉलिन्स- जो चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ‘कोलंबिया’ यानाचा सूत्रधार होता, त्याच्यामुळे या दसपटीचे शंभरपट झाले. अन् मोहीम ‘शंभर टक्के’ यशस्वी झाली. हे एकवरच्या शून्यांचं महत्त्व!’ आई पुन्हा डोशात गुंतली अन् बाबा पुढे म्हणाले, ‘मात्र, चंद्रावर यान उतरवूनसुद्धा प्रत्यक्ष चंद्रावर कॉलिन्सला उतरता आलं नाही. त्याच्यावर इतर जबाबदाऱ्या होत्या. पृथ्वीवर अमेरिकेतल्या ‘नासा’च्या सेंटरशी सतत संपर्कात राहणं महत्त्वाचं होतं. या सेंटरच्या विविध विभागांत काम करणारे शेकडो तंत्रज्ञ अन् शास्त्रज्ञ या ‘अपोलो- ११’ मोहिमेशी जोडले गेले होते. मोहिमेत काही अनपेक्षित चुकादेखील झाल्या, पण त्या सगळ्या सुधारून ही मोहीम यशस्वी झाली. १६ जुलै १९६९ या दिवशी ‘सेटर्न’ रॉकेटमधून उड्डाण झाल्यावर पृथ्वीवरून हा प्रवास सुरू झाला. चंद्राच्या कक्षेत शिरण्यापूर्वी तीन दिवस ते अंतराळात होते. अन् ठरल्या वेळेच्या गणितानुसार त्यांचं यान २० जुलैला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं अन् परतीचा प्रवास सुरू झाल्यावर २४ जुलैला पृथ्वीवर- म्हणजे पॅसिफिक महासागरात, तिघेही नऊ  दिवसांच्या आत सुखरूप परतले. साऱ्या जगाचे डोळे या घटनेकडे लागले होते. अगदी डोळे मिटून उघडायला लागतो त्या क्षणाचाही बदल न होता, सारी योजना पार पडली.’ बाबा ईशानकडे पाहात हसत होते. ईशानलादेखील ‘डोळ्यां’चा इशारा कळला.

‘किती भारी वाटलं असेल नाही बाबा तेव्हा तुम्हाला?’ ईशान म्हणाला अन् लगेच जीभ चावली. आजी टपली देत ईशानला म्हणाली, ‘ईशान, तुझ्या बाबाचा जन्म व्हायचा होता अजून! बघ, हुशार आहेस, पण अशी तुझी धांदल नडते. अरे, माणूस चंद्रावर उतरला तेव्हा तर आपल्याकडे टीव्ही नव्हता. सगळे रेडिओ-ट्रान्झिस्टरला चिकटलेले. मी तेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला होते. चंद्रावरचं मानवाचं पहिलं पाऊल आम्ही कॉलेजात खूप सेलीब्रेट केलं होतं. चंद्रावर पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँग म्हणाला, ‘‘हे माणसाचं छोटं पाऊल मानवजातीसाठी खूप मोठं आहे!’’

‘कळलं ईशान? जरी नील आर्मस्ट्राँगचं नाव लक्षात राहिलं तरी त्यामागे इतक्या लोकांचे अहोरात्र कष्ट होते. प्रत्येकाच्या कामाचं महत्त्व तितकंच होतं. अगदी शेवटच्या माणसाचं, अगदी शेवटच्या शून्याचंदेखील महत्त्व असतं प्रत्येक गोष्टीत. त्याशिवाय हे वेळेचं गणित, त्यानुसार काम करणं एरवी अशक्य. मग सांग, या ऐतिहासिक चांद्रमोहिमेत ‘हीरो’ कोण अन् ‘झीरो’ कोण?’

‘सॉरी बाबा. पहिला नंबर कधीही महत्त्वाचा, पण म्हणून नंतरचे काही कमी महत्त्वाचे नाहीत.’

‘ईशान, कुठलंच काम कमी महत्त्वाचं नसतं. प्रत्येकाने आपल्याला आपल्या क्षमतेनुसार नेमून दिलेलं काम चोख करणं, हेच त्या कामाचं यश. मग ते काम स्वत:पुरतं असो वा मोठय़ा कामाचा एक भाग असो.. अगदी घराची स्वच्छता, स्वयंपाक करणं हेदेखील कमीपणाचं नसतं. नो वन इज जस्ट झिरो, कळलं?’ बाबांचा ईशानला एक टप्पू बरोबर डोस! आता आईदेखील शेवटचा डोसा स्वत:च्या ताटलीत घेऊन संवादात सामील होत म्हणाली, ‘ईशान, गणितातला हा ‘झीरो’, हे शून्य भारताने जगाला दिलं, त्यानंतर कुठच्याही मोजमापाचे प्रश्न सुटले. या साऱ्या ग्रह-ताऱ्यांचा, या विश्वाच्या गणिती व्याप्तीने शोध घेणं सोपं झालं. शून्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला का, अशा अंतराळ मोहिमेतला? आपण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तर नेहमी गृहीतच धरतो. पण या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडल्यावर चंद्राच्या वा इतर ग्रहांच्या कक्षेत शिरण्यापूर्वीच्या मधल्या अवकाशांत वस्तूंच्या-माणसांच्या तरंगत्या अवस्थेला काय म्हणतात?’

‘अं..अं.. झीरो ग्रॅव्हिटी.. शून्य गुरुत्वाकर्षण अवस्था, करेक्ट?’ ईशान विचार करून म्हणाला.

‘थोडंफार बरोबर.. ‘वजनरहित शून्यावस्था’ म्हणतात!’ आईची दुरुस्ती. नेहा हे सगळं काळजीपूर्वक ऐकत होती.

बाबांनी तिला विचारलं, ‘नेहा, तुला अर्थ कळला का गं, वजनरहित शून्यावस्थेचा? तुला अजून हे शिकायचंय.’

‘बरचसं कळलं बाबा. मी बघितलंय हे टीव्हीवर. काय मस्त तरंगतात तेव्हा माणसं हवेत! मलादेखील आता तसंच होतंय..

आईच्या हातचे मस्त डोसे खाऊन माझीदेखील तशीच ‘वजनरहित शून्यावस्था’ झाली आहे!’

नेहाला ईशानने ‘झीरो’ म्हटल्यामुळे सुरू झालेलं वर्तुळ हास्यकल्लोळात पूर्ण झालं!

प्रभाकर बोकील

pbbokil@rediffmail.com