आज ठाण्याची आजी येणार आणि चार दिवस राहणार म्हणून मनू अगदी खुशीत होती. ही आजी मनूच्या घरी माहीमला आली की एकदा तरी दोघींनी पुस्तकांच्या दुकानात जाऊन मराठीतील गोष्टींची पुस्तकं खरेदी करायची- असा दोघींमध्ये अलिखित करार झाला होता. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या पाच- सहा वर्षांच्या नातीला मराठी वाचनाची गोडी लागावी यासाठी आजीचा हा सगळा आटापिटा.
‘‘आजी, आजच जाऊ या का पुस्तकं आणायला?’’ आजीचं घरात पाऊल पडल्याक्षणी मनूचा प्रश्न.
‘‘हो, जाऊ या ना. आजच जाऊ.’’ मनूचा उत्साह बघून आजी सुखावली.
‘‘आजी, तू चीज सॅन्डविच बनवून ठेव बरोबर न्यायला.’’ ..मनूची फर्माईश.
शिवाजी मंदिरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये जाऊन मुलांच्या विभागात ठिय्या मारून गोष्टींची पुस्तकं चाळणं, निवडणं हा मनूच्या दृष्टीने एक आनंदोत्सवच होता. पुस्तकांच्या दुनियेत बागडताना दीड-दोन तास उलटले तरी स्वारी घरी परतायचं नाव घेत नसे. त्यामुळे भूकलाडू, तहानलाडू, पुस्तकं निवडण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसायला रद्दी पेपर असा सर्व सरंजाम बरोबर न्यावा लागे. जणू छोटीशी पिकनिकच!
आज शाळेत सोडायलाही तिला सोबत आजीच हवी होती. शाळेच्या गेटपाशी किमया दिसताच मनूला राहवलं नाही.
‘‘ किमया, आज मी आणि आजी गोष्टींची पुस्तकं खरेदी करायला जाणार आहोत. इंग्रजीची नाही काही.. मराठीतील गोष्टींची पुस्तकं.’’ मनूच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
‘‘मीसुद्धा येऊ तुमच्याबरोबर?’’ आपल्या आईकडे पाहतच किमयानं मनूला विचारलं.
‘‘हो, ये ना! माझा बाबा सोडेल आपल्याला.’’ मनूने मोठेपणा घेत सांगितलं. मुलींचा उत्साह पाहून किमयाच्या आईने संमती दर्शवली. मागून येणाऱ्या पर्णिकाच्या कानांनी हे शब्द टिपलेच.
‘‘कुठे जाताय गं तुम्ही दोघी?’’
तिची उत्कंठा पाहून मनूने तिलाही आमंत्रण दिलं. तीही तयार झाली. लेकीच्या प्रबळ इच्छेपुढे पर्णिकाच्या बाबाचंही काही चाललं नाही. अर्थात, आजी आणि मनूचे बाबा या चिमुरडय़ांसोबत होते म्हणून कसली चिंता नव्हती म्हणा. पर्णिकाच्या बाबानेही तिला परवानगी दिली. पण त्यांनी तिला बजावलं, की आजी आणि मनूच्या बाबांना कुठलाही त्रास द्यायचा नाही. यावर तिघीही मोठय़ाने ‘हो’ म्हणाल्या. आजीनेही पर्णिकाच्या बाबाला ‘‘मुली खूप गुणी आहेत, त्रास नाही द्यायच्या..’’ असं सांगितल्यानं त्या आणखीच खूश झाल्या. आपला एकत्र पुस्तक खरेदीचा बेत यशस्वी होणार हे पाहून तिघींच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
त्यानंतर या त्रिकुटाचं शाळेत दिवसभर खुसुरफुसुर सुरू होतं. शेवटी बाईंनी शिक्षा म्हणून या तिघींना तीन कोपऱ्यांत बसवलं. तरी तिथूनही त्यांच्या खाणाखुणा सुरूच होत्या. आजीबरोबर पुस्तकं खरेदी करायला जायचं म्हणून तिघीही उत्साहात होत्या.
ठरल्याप्रमाणे शाळा सुटल्यावर मंडळी बुकस्टॉलला पोहोचली. मनू तिथे आधी तीन-चारदा आलेली. बाकी दोघी नवख्या. मग त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी ती कशी दवडणार?
‘‘हं इकडून या.. मधे पायऱ्या आहेत. या उतरून. खाली आलं की डावीकडे वळा. ही बघा पुस्तकंच पुस्तकं.’’ मनूचा घोडा आज सगळ्यात पुढे होता.
नव्याकोऱ्या पुस्तकांचा गंध.. त्यातील रंगीबेरंगी चित्रं.. पुस्तकं स्वत: हाताळण्यातील मजा.. त्या तिघी अगदी हरखून गेल्या. पुस्तकांच्या वारुळात बुडून गेल्या.
‘‘पानं सावकाश उलटा, नाहीतर पुस्तक फाटेल. मोठय़ाने बोलू नका. इथे आवाज आहे का कुणाचा? आणि आवडतील ती पुस्तकं बाजूला करून ठेवा. शेवटी आपण ठरवू- कोणती घ्यायची ती.’’ आजीची रनिंग कॉमेंट्री सुरू होती.
तास-दीड तासाच्या घुसळणीनंतर आजीच्या समोर पुस्तकांचा ढीग पडला. आता आजीची कसोटी होती. निव्वळ चित्रांवरून निवडलेल्या त्या गठ्ठय़ात काय नव्हतं? कृष्णलीला, रामकथा तर होत्याच; शिवाय ध्रुवबाळ, शिवाजी महाराज, भक्त प्रल्हाद.. झालंच तर चिऊ-काऊ, मनीमाऊ, वाघोबा.. असं बरंच काही!
सगळ्यांच्या घरात आजी-आजोबा दिसताहेत. आजीने ठोकताळा बांधला.
‘‘हं, आता बारीक अक्षरातील पुस्तकं प्रथम बाजूला काढा आणि मोठी, रंगीबेरंगी चित्रं असणारी पुस्तकं एका बाजूला करा.’’ आजीच्या सूचनांनुसार गठ्ठय़ात दहा-बारा पुस्तकं उरली.
‘‘आता यातली दोन-दोन पुस्तकं प्रत्येकीसाठी निवडू या. भांडायचं नाही. वाचून झाली की एकमेकींकडे अदलीबदली करायची. प्रत्येकीला सहाही गोष्टी सांगता आल्या की मगच पुन्हा इथं यायचं. कबूल?’’ आजीच्या बोलण्यावर सगळ्यांच्या माना हलल्या.
त्यानंतर बराच ऊहापोह होऊन अंतिम निवडप्रक्रिया पार पडली. ‘हुश्श्य!’ करत आजी बिल देण्यासाठी वळेपर्यंत इकडे डबे उघडलेसुद्धा. वाटेतल्या पायऱ्यांवर बसलेली त्यांची ती अंगतपंगत पाहताना आजीच्या पोटात गोळा आला. पण काऊंटरवरील काका आणि बुकस्टॉलमध्ये येणारे-जाणारे सगळ्यांच्याच नजरेत कौतुक दिसत होतं.
पुस्तक खरेदीचा कार्यक्रम पार पडल्यावर मैत्रिणींना त्यांच्या त्यांच्या घरी सोडून आपल्या घरात शिरताच मनूचा आदेश- ‘‘आजी, आपण आत्ताच्या आत्ता एक पुस्तक वाचायचं.’’
‘‘मग डोरेमॉनला सुट्टी द्यावी लागेल.’’आजीने मनूला पेचात टाकलं. पण काय आश्चर्य! त्याक्षणी तरी गोष्टीच्या पुस्तकांचा विजय झाला. आजी समाधानाने हसली. हा विजय तिचाही होता ना!
संपदा वागळे waglesampada@gmail.com

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन