एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन त्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या यशवंतांची यशोगाथा कथन करणारं  साप्ताहिक सदर..
जहांगीरच्या कलादालनातली बस्तरच्या एका आदिवासी कलावंताची अद्भुत शिल्पकला न्याहाळताना एका शिल्पकृतीपाशी मी थबकलो. जात्यावर दळणारी एक स्त्री आणि तिच्यासमोर बसून तिला मदत करणारा पुरुष! कुणीही गावाकडच्या स्मरणरंजनात गढून जावं असं जुन्या खेडय़ातील कुटुंबसंस्कृतीचं ते अस्सल, बोलकं शिल्प न्याहाळत असतानाच बाजूला एक तरुण येऊन थांबला. चारी अंगांनी ते शिल्प पाहत असताना त्याची नजर काहीशी भावूक झाली होती. तो कलेचा जाणकार चाहता असणार, हे त्या प्रदर्शनाच्या आयोजकाने ओळखलं असावं. तोही बाजूला येऊन उभा राहिला. एका कलावंतानं एका अस्सल कलाकृतीला आपल्या केवळ डोळ्यांतून दाद दिल्याचं समाधान त्या आयोजकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं होतं.

मी त्रयस्थ झालो. पुढच्या क्षणाची वाट पाहू लागलो. आणि अपेक्षेनुसारच घडलं!

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘अप्रतिम!’ तो तरुण स्वत:शीच बोलला. आता आयोजकाची खात्रीच पटली. तो पुढं येऊन शिल्पाचं वर्णन करू लागला.

‘माहीत आहे मला. गावाकडं  माझी आई असंच जात्यावर दळायची आणि वडील मदत करायचे..’ तो बोलून गेला आणि पुढे म्हणाला, ‘देखो भैया, मैं भी आर्टिस्ट हूँ. आपके एक्झिबिशन के बाद मेरा यहीपर लगनेवाला है.. इसलिये सही दाम बताओ. मैं इस कला की सही कदर करूंगा..’

मग आयोजकानं त्याला किंमत सांगितली आणि माझे डोळे विस्फारले. ते अप्रतिम शिल्प होतंच; पण त्याची एवढी किंमत असेल असं मला वाटलं नव्हतं. त्या तरुणानं लगेच खिशातून चेकबुक काढलं आणि चेक लिहून दिला.

मी नजरेनंच त्याला दाद दिली तेव्हा मस्त हसत हात पुढे करून तो म्हणाला, ‘मी शशिकांत धोत्रे!’

क्षणभरातच मला आठवलं- फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या समाजमाध्यमांवर त्याने चितारलेल्या रंगीत पेन्सिलचित्रांनी त्या जगाला वेड लावलंय. मी काही वेळ त्याच्याकडे पुन्हा नव्या नजरेनं पाहत राहिलो. तेवढय़ात पावती घेऊन तो आयोजक समोर आला. शशिकांतनं ती पावती जपून घडी करत खिशात ठेवली.

आम्ही बाहेर आलो तेव्हा आसपासची मुंबई दिव्यांनी आणि वाहनांच्या धावत्या प्रकाशझोतांनी लखलखली होती. जहांगीरच्या बाहेरच कट्टय़ावर आम्ही बसलो. बाहेर गजबजाट असूनही ही जागा मात्र कमालीची शांत, निवांत वाटत होती. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि तरुण वयातच कलाक्षेत्राचं शिखर गाठलेल्या एका चित्रकाराचा प्रवास उलगडू लागला. रस्त्यावरून पळणाऱ्या दिव्यांच्या दिशेने नजर लावत शशिकांत बोलत होता..

‘आपण चित्र काढू शकतो हे मला लहानपणीच उमगलं होतं. शाळेत असताना शेवटच्या रांगेत बसून वर्गातल्या मुलांचे चेहरे चितारण्यातच माझा सारा वेळ जायचा. त्यामुळे अभ्यासावरचं लक्ष उडालंच. हातात कागद आणि पेन्सिल असेल तर गणितं सोडवण्याऐवजी, गृहपाठ करण्याऐवजी कागदावर चित्रच उमटायचं. आपल्याला चित्रकार व्हायचंय, हे त्या वयात मी ठरवलं नव्हतं, पण शाळेत शिकायचं नाही, हे मात्र मनात घट्ट होत होतं..’

सोलापूर जिल्ह्यतल्या मोहोळ तालुक्यातलं शिरापूर नावाचं खेडं.. तिथलं तीन भिंतींचं एक घर. एका बाजूला भिंतच नाही. वडील दगड फोडायचे. नववीनंतर कुटुंबाच्या कमाईला हातभार लावण्यावाचून पर्यायच राहिला नाही आणि शशिकांतही दगड फोडायच्या कामाला लागला. अभ्यासात लक्ष नव्हतंच. त्यामुळे दहावीत नापास झाला. पुढे तीन-चार र्वष मिळेल ती कामं केली. पण चित्र काढायचं वेड मात्र कायम राहिलं. परिस्थितीनं आपल्यासमोर आव्हान उभं केलंय, हे कळू लागलं तेव्हा ते पेलायचंच असं त्यानं ठरवलं. संघर्षांशिवाय पर्यायच नव्हता. अंगात प्रचंड आत्मविश्वास आणि मोठी स्वप्नं पाहायची सवय.. आपण जे ठरवू ते करायचंच हा निर्धारही होताच. दारिद्रय़ात पिचलेल्या आई-वडिलांना पोराच्या भविष्याकडे पाहायला वेळच नव्हता. पोरगा काय करतोय याची त्यांनी कधीच विचारपूस केली नाही.

दहावीत नापास झाल्यावर चार-पाच र्वष मजुरी केली. रेतीच्या ढिगाऱ्यावर मागे बसून चालत्या ट्रकमध्ये चित्रे काढताना सराव होत गेला. रंगीत पेन्सिल आणि कागद हेच आपल्या कलेचं माध्यम राहणार हे त्याच्या लक्षात येत गेलं.

सहज शशिकांतनं हातातला एक कागद उलगडला. लहानपणी कधीतरी काढलेलं एक पोटर्र्ेट त्यावर होतं. त्यानं मोबाइल काढला आणि कुणालातरी बोलावलं. काही मिनिटांतच समोर एकजण उभा राहिला. हा शशिकांतचा जीवलग बालमित्र. शशिकांतच्या हातातल्या कागदावर त्याचं लहानपणाचं रूप उमटलं होतं. त्याकडे पाहून दोघंही हसले. आणि शशिकांत पुढे बोलू लागला..

‘मजुरी करता करता कधीतरी वर्तमानपत्रं वाचायची सवय लागली आणि चित्रांची प्रदर्शनं भरतात, लोकं चित्रं विकतही घेतात, हे कळू लागलं. आपल्या हातातल्या कलेला मोल आहे याची जाणीव झाली आणि पुढे शिकावं असं ठरवलं. कलाशिक्षक व्हायचं असेल तर बारावी तरी पास व्हायला हवं. मग काबाडकष्ट केले. बारावी करून जे. जे.ला आलो. प्रवेश परीक्षा दिली आणि पासही झालो. हा मित्र तेव्हा एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागला होता. त्यानं साठवलेले पाच हजार रुपये माझ्या हातावर ठेवले आणि सांगितलं, ‘तू पुढं शीक.’ ते पैसे घेऊन मी मुंबईत आलो. आणि कॉलेज सुरू झालं. घरची परिस्थिती बिकटच होती. त्याच काळात वडिलांना दारूचं व्यसन लागलं. मग आईवरच कुटुंबाचा भार पडला. मला घरची काळजी वाटत होती. मुंबईत मन रमत नव्हतं. बेचैन अवस्थेतच २००३ साली मी मुंबई सोडून पुन्हा गावाला गेलो. त्यावेळची कुटुंबाची स्थिती ही एक वेगळीच कहाणी होईल..’

बोलता बोलता शशिकांत थांबला. बहुधा मुंबईहून गावी परतणं, हा त्याच्या कहाणीतील कलाटणीचा प्रसंग होता-

‘गावाला गेल्यावर मात्र काबाडकष्टाची कामं करायची नाहीत असं मी पक्कं ठरवलं होतं. लोकांची पोटर्र्ेट करून पैसे मिळवायचे आणि घर चालवायचं असं ठरवलं. सोलापुरात काम सुरू केलं. घरात आईला पैसे देऊनही हाताशी पैसे शिल्लक राहू लागले. थोडे पैसे साठल्यावर मी पुण्यात अ‍ॅनिमेशन शिकण्यासाठी आलो. कोर्स पूर्ण झाला आणि २०१० साली पुन्हा मुंबईला आलो. कुणाच्या घरात लहान मुलांच्या बेडरूम्स रंगवून द्यायच्या, त्यावर चित्रं काढायची असं सुरू केलं. जे. जे.मधलं शिक्षण सुटलंच होतं. दरम्यान मी हौसेपोटी काढलेली कितीतरी चित्रं जमा झाली होती. त्याचवेळी माझा एक मित्र खोलीवर आला आणि ती चित्रं बघून त्यानं स्पर्धेसाठी चित्र पाठवायला सुचवलं. व्यावसायिक चित्रकारांच्या स्पर्धेत मी पहिल्यांदाच उतरलो आणि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या त्या स्पर्धेत निवडल्या गेलेल्या माझ्या पहिल्या पेन्सिल रंगचित्राला अठरा हजारांची किंमतही आली. आपलं चित्र एवढय़ा किमतीला विकलं जाईल असं मलाही वाटलं नव्हतं..’ स्वत:शीच हसत शशिकांत बोलून गेला. बहुधा पहिल्या चित्राचे पैसे हाती आल्यानंतरचा क्षण त्याच्या डोळ्यासमोर जिवंत झाला होता..

‘ते चित्र एका बडय़ा गॅलरीवाल्यानं विकत घेतलं होतं. त्याला पुढे आणखी चांगली किंमत येणार याची त्याला खात्री असावी. पण त्या चित्रामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि लगेचच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या व्यावसायिक स्तरावरील स्पर्धेत मी सहभागी झालो. त्यातील माझ्या चित्राला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावे असलेला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला..’

‘तेव्हा आयुष्याचं खडतरपण आता संपलं याची मला जाणीव झाली. माझ्या चित्रांना जाणकारांकडून मागणी सुरू झाली होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धातील बक्षिसांचा ओघ सुरू झाला होता. आता मागे वळून पाहायचं नाही असं मी ठरवलं. स्पर्धेत भाग घेणं थांबवलं. रोज आठ-दहा तास काम केलं तर महिनाभरात एक मोठं चित्र तयार होतं आणि त्याला मोठी किंमतही मिळते. चित्रकलेच्या क्षेत्रात जाणकार लोक पैसा गुंतवतात. उद्या या चित्राला मोठी किंमत मिळणार हे त्यांना कळतं. आणि तसंच होतं. माझ्या काही चित्रांनी त्यांना नंतर भरपूर परतावा मिळवून दिलाय.. आणि मलाही. पैशासोबत समाधानही मिळालंय. आता चांगले दिवस आलेत. देशविदेशात नाव झालंय. अनेक चित्रं परदेशांत विकली जातात. आता मी स्थिरावलोही आहे.’

‘आता प्रदर्शनाआधीच माझी चित्रं विकली जातात. लोक चित्रासाठी सहा-सहा महिने ताटकळतात. या सगळ्या वाटचालीत मी माझं बालपण मात्र हरवलंय. पण आताच्या मुलांना तर बालपणच नाही. सगळी मुलं मशीनसारखी वाटतात. त्यांना चंद्र-तारे माहीत नाहीत. पायाला खडे टोचणं, माती लागणं माहीत नाही. त्यांना अंगाईगीत माहीत नाही. नदी-ओढय़ात पोहणं माहीत नाही. लहानपणाच्या जाणिवांचा बोजवारा उडाल्यासारखं वाटतं. निसर्गातही मोठा बदल झाल्यासारखं वाटतं..’

‘पण तुझ्या चित्रांत ते गमावलेपण दिसत नाही..?’ शशिकांतला थांबवत मी विचारलं. पुन्हा तो भूतकाळात गेला..

‘मी गोटय़ा खेळणाऱ्या मुलांची चित्रं केलीत. जात्यावर दळणाऱ्या बायकांची चित्रं काढली. मेंदी रंगवणाऱ्या मैत्रिणींचीही चित्रं काढलीत. माझं नातं माझ्या भूतकाळाशी आहेच..’ शशिकांत ठामपणे म्हणाला.

‘अलीकडे माझ्या चित्रांवर शहरी वातावरणाचा प्रभाव वाढतो आहे. आता मी शहरातल्या समस्यांना हात घालणार आहे. प्रदूषण, शहरांचं बकालपण, अस्ताव्यस्त पसारा आणि त्यातही जगण्याची जीवघेणी स्पर्धा असे अनेक विषय माझ्या डोळ्यापुढे आहेत. पुढच्या काही महिन्यांत एक प्रकल्प म्हणून मी अशी चित्रं काढणार आहे. ती चित्रं हा समाजासमोरचा आरसा असेल. आणि ते प्रतिबिंब पाहून समाजाला आपली चूक कळून येईल. समाजात बदल घडवण्यासाठी कलेचा वापर करण्याचं मी ठरवलंय. आणि तुम्हाला माहीतच आहे- मी ठरवलं की ते तडीला नेतोच. माझा तो स्वभावच आहे..’

शशिकांतची नजर समोरच्या अस्ताव्यस्त वाहणाऱ्या गर्दीवर एकवटली होती.. तो थांबला. आणि आम्ही उठलो.

दोन-चार दिवसांपूर्वीच शशिकांतच्या चित्रांचं जहांगीरच्या त्या दालनात प्रदर्शन झालं. चित्रं अगोदरच विकली गेली होती. तरीही ती न्याहाळण्यासाठी रसिकांनी गर्दी केली. शशिकांतला ते माहीतच होतं!

दिनेश गुणे
dinesh.gune@expressindia.com