महाभारतातील युद्धात जेवढी शस्त्रास्त्रे व कूटनीतीचा वापर केला गेला नसेल तेवढय़ा अस्त्रांचे व कुटनीतीचे प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपकडून केले जात आहेत. शिवसेनेला कौरवांची उपमा देण्यापासून कोथळा काढण्यापर्यंतचे सर्व शब्दप्रयोग भाजपने वापरले तर शिवसेनेनेही गाजरास्त्र व गुंडअस्त्राचा जोरदार प्रयोग भाजपवर केला. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरच्या शेवटच्या चोवीस तासांत समाजमाध्यांवर या अस्त्रांचा स्वैर वापर केला गेल्याने या माध्यमांच्या मैदानात चिखलफेकीचा खेळ रंगला.

गेल्या चोवीस तासांत सोशल मीडिया अस्त्रप्रयोगात विशेष प्रावीण्य असलेल्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बदनामीअस्त्र व गुंडास्त्राचे हल्ले सातत्याने चाढवले. अपप्रचाराचे लेखास्त्र, टिंगलअस्त्राचा मुक्त वापर करत शिवसेनेचा वाघ हा वाघ नसून बकरी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. कधी शिवसेनेला ‘रावणसेना’ बनवून भाजपच्या हनुमानाने ती जाळल्याचा आभास निर्माण केला.

सोशल मीडियावर यासाठी अनेक कार्टून, प्रभावी चित्रे, आभासी चित्रे टाकण्यात येत होती. भाजपच्या या हल्ल्याची ओळख असलेल्या शिवसेनेने मग जोराचा प्रतिहल्ला सुरू केला. ‘वाघाच्या जबडय़ात घालून हात करून घेतला स्वत:चा घात’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हाता-पायाला प्लास्टर लावलेल्या अवस्थेतील चित्र सेनेच्या गोटातून टाकण्यात आले. ‘मुख्यमंत्र्यांचे पारदर्शक शिलेदार.. पप्पू कलानी’, ‘नका ठोठावू आमचे दार आम्ही शिवसेनेचे शिलेदार’, ‘ठाण्यातील गुंडांना बिभिषण ठरवून मुख्यमंत्र्यांनी ठाण्याची केली लंका आणि ठाणेकरांना बनवले राक्षस’ अशी अनेक ‘वाग्अस्त्रे’ सोशल मीडियातून फिरवली जात आहेत.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून शिवसेनेने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी शिवसेनेचा कावा ओळखून आहे.. मी फसणार नाही, तर केवळ विकासावर बोलत राहणार.. मुख्यमंत्र्यांनी पुढे आपलेच शब्द गिळले आणि सुरू झाले कौरव-पांडवांचे प्रचारयुद्ध.. रावण, बिभीषण, कोथळा काढण्यापासून शिवसेनेला बकरी म्हणण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सर्व ‘वाक्अस्त्रे’ चालवली..आता प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियास्त्राचा सेना-भाजप तसेच मनसेकडून मुक्तपणे वापर सुरू आहे.

ल्ल महाभारतात सायंकाळनंतर युद्ध थांबवले जात होते, परंतु आजच्या महाभारतात दिवस-रात्र सर्वप्रकारचे युद्ध सुरू असून आजच्या रात्री ‘लक्ष्मीदर्शनास्त्र’ व सुरास्त्राचा वापर जोरात होणार अशी चर्चा आहे.