मुंबई : डी.जी. रुपारेलच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मनाला भावतो तो रुपारेलचा निसर्गसंपन्न कॅम्पस. नव्या इमारतीच्या कट्टय़ापासून थेट समोर पाहिलं तर रुपारेलची जुनी इमारत आणि मध्यभागी आयताकृती हिरवेगार मैदान. या मैदानात विद्यार्थ्यांच्या बैठकांबरोबरच, खेळ, हौशी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे वर्ग असे अनेक कार्यक्रम होत असतात. मात्र गेल्या पाच वर्षांपासून रुपारेलमध्ये एक नवीन पाहुणा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मैदानाच्या एका कोपऱ्यात हा पाहुणा विद्यार्थ्यांना नवं व्यासपीठ मिळवून देत आहे. या ‘रूपांगण’ची मुहूर्तमेढ रोवली ती रुपारेलचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी.

‘रूपांगण’ म्हणजे विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ. येथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येतात. नाटकांपासून ते सिनेमा आणि नवनव्या विषयांवर यामध्ये चर्चा घेतली जाते. काही दिवसांपूर्वी सैराट या सिनेमावर चर्चा घेण्यात आल्याचे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक अविनाश कोल्हे यांनी सांगितले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना विचार करायला शिकविणे आणि भूमिका घ्यायला शिकवणे आणि दुसऱ्याची भूमिका ऐकून घ्यायला शिकविणे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे कोल्हे यांनी नमूद केले. या माध्यमातून वेगवेगळ्या शैक्षणिक सहली नेल्या जातात, तर अनेकदा वेगवेगळ्या देशांतील कलावंतांची सादरीकरणंही या व्यासपीठावर केली जातात.

महाविद्यालयांमध्ये कॅन्टीनव्यतिरिक्त वैचारिक घुसळण होण्यासाठी एका ठिकाणांची गरज असते, जी विद्यार्थ्यांच्या कायम आठवणीत राहतात.

त्यातूनच रूपांगणाची निर्मिती झाली असल्याचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी सांगितले. रूपांगण तयार करण्यासाठी पालिकेने टाकून दिलेल्या पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे ही त्यातील महत्त्वाजी बाजू आहे. फार खर्च न करता रूपांगण उभारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पायऱ्यांप्रमाणे ही वास्तू तयार करण्यात आली आहे. याच्या बांधणीसाठी महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापकांचा पुढाकार आहे. त्यामुळे रूपांगणसोबत रुपारेलच्या प्रत्येक व्यक्तीचा ऋणानुबंध आहे. अनेकदा विद्यार्थी या जागेत अभ्यासासाठी बसतात. मराठी वाङ्मय विभागाच्या प्राध्यापक डॉ. अनघा मांडवकर यांनी या वास्तूला रूपांगण हे नाव सुचविले. सध्या कॅम्पबरोबरच रूपांगणात विद्यार्थी चांगलेच रमत आहेत.