देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी तसेच तरुणांमधील नवविचार व उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात जाहीर केली आहे, तर सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला ‘मेक इन इंडिया’ सप्ताहही जगभरातील उद्योजकांना व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या पाश्र्वभूमीवर देशातील तरुणांमध्ये चतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईमध्येही नवनवीन कल्पना लढवणाऱ्या, संशोधन करणाऱ्या विद्यार्थी-तरुणांमध्ये सध्या एखादा नवीन विचार घेऊन, कल्पक पद्धतीने उत्पादन तयार करणाऱ्या स्टार्टअप कंपनी सुरू करण्याकडे ओढा दिसत आहे. विद्यार्थी आता शिक्षण पूर्ण होण्याची वाट न पाहता महाविद्यालयांमध्ये शिकत असतानाच आपल्या मित्रमत्रिणींच्या गटाद्वारे वा स्वतंत्रपणे असे स्टार्टअप्स सुरू करत आहेत. गेल्या महिन्याभरात भांडुप येथील एनईएस रत्नम महाविद्यालय, विलेपाल्रे येथील साठय़े महाविद्यालय, कुर्ला येथील डॉन बॉस्को महाविद्यालय इत्यादी महाविद्यालयांत पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सचे महोत्सव, प्रदर्शने तसेच स्पर्धामध्ये मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांचे स्टार्टअप्स सहभागी झाले होते. यात अभियांत्रिकी, विज्ञान शाखेबरोबरच व्यवस्थापन, औषध विज्ञान, आर्किटेक्चर शाखेचे विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअप्स सुरू केले आहेत. थोडासा उलटा थोडासा सुलटा विचार करत कल्पक संशोधन करून नवनवी उत्पादने घेत असलेल्या मुंबईमधील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी जणू ‘मेड इन कॉलेज’ मोहीमच सुरू केली आहे. यातील काही मोजक्या कल्पना..

सोमय्यामधील विद्यार्थ्यांचा ‘ऑफी’
सध्याच्या काळात स्मार्टफोन वा संगणकाद्वारे लोकांना हवी ती माहिती लिखित वा दृक्श्राव्य स्वरूपात मिळत असते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे लोकांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचा कल ही माहिती अधिक सुलभ पद्धतीने व जलदरीतीने कशी मिळेल याकडे असतो. परंतु माहितीच्या या खजिन्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या स्मार्टफोन वा संगणकाला इंटरनेटची सुविधा असणे मात्र गरजेचे असते. ती सुविधा नसेल तर माहितीपर्यंत पोहोचणे दुरापास्त होते. सामान्यांना भेडसावणारी ही समस्या लक्षात घेऊनच विद्याविहार येथील सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ऑफी’ या नावाने इंटरनेटची सुविधा नसतानाही माहिती पुरविणारे एक नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. नुकतेच जानेवारी महिन्यात सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कल्पक शोधांना वाव देणाऱ्या ‘रिसर्च इनोव्हेटिव इनक्युबेशन डिझाइन लॅब’ (रिडल)या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. यातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आतापर्यंत सुमारे चाळीस स्टार्टअप्स् सुरू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत कॉम्प्युटर अभियांत्रिकी शाखेच्या कौनिल ध्रुव व राज धिरवानी तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग शाखेच्या अमित शहा, योगेश ताम्हाणे व विश्वप्रकाश शुक्ला या विद्यार्थ्यांनी ऑफी हा स्टार्टअप सुरू केला आहे. यात इंटरनेटशिवाय शैक्षणिक व मनोरंजन क्षेत्रांबाबत अनेक लेख, बातम्या, माहितीपट, सिनेमे, संगीत असा माहितीचा खजिना पुरविणारे तंत्रज्ञान त्यांनी तयार केले आहे. यासाठी वापरकर्त्यांला स्वत:चा स्मार्टफोन त्यातील वायफायद्वारे ऑफीच्या उपकरणाला जोडायचा आहे. त्यानंतर ऑफी उपकरणातील अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे आपल्याला हवी ती माहिती आपण पाहू शकतो. मुख्य म्हणजे यासाठी कोणत्याही इंटरनेट सुविधेची गरज नाही. ऑफलाइन असतानाही आपण याद्वारे सिनेमे, माहितीपट पाहू शकतो. सर्वाना आकर्षति करू शकणारे ऑफी उपकरण सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे स्थानकात व सोमय्या महाविद्यालयाच्या तीन कॅफेटेरियांमध्ये बसवण्यात आले आहे. आता हे उपकरण रेल्वेमध्ये बसवण्यात यावे यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत.

अंधांसाठी मोबाइल
अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या साहाय्याने वाचू शकतात यामुळे संगणकापासून ते मोबाइलपर्यंत त्यांना ब्रेल लिपी उमटवलेल्या यंत्राची गरज असते. मात्र सध्या बाजारात मिळणाऱ्या मोबाइलवर एलईडी डिस्प्ले असतो. त्यामुळे पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान इंजिनीअिरग महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी संचारक नामक मोबाइल खास अंधांसाठी विकसित केला आहे. यामध्ये ब्रेल लिपीचा डिस्प्ले असून संचारक नावाचे ब्रेल लिपीतील पर्यायही आहे. या दोन्हींचा उपयोग अंधांसाठी संगणक, अंकात्मक मनगटातील घडय़ाळ, मोबाइलमधील दिनदíशका, मोजणी यंत्र आदी उपयुक्त वापर या मोबाइलच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. अंध व्यक्तींच्या उपकरणात सोलेनॉइडचा वापर केला जातो. छोटय़ा पेन्सिलच्या अग्रभागाएवढय़ा असणाऱ्या या सोलेनॉइडचा वापर त्यांनी संचारक मोबाइलच्या दर्शकी (डिस्प्ले) भागात केला आहे आणि पूर्णपणे ब्रेल लिपीतील डिस्प्ले बनविला आहे. यावर सोलेनॉइडपासून बनलेल्या छिद्रात पिन बसविल्या आहेत. संकेत मिळताच त्या पिन वर येतात व अंध व्यक्ती मोबाइलवर संदेश लिहू व वाचू शकतो. आदी तत्सम गोष्टी करू शकतो. या विद्यार्थ्यांनी संचारक मोबाइलच्या शोधाचे पेटंट घेतले असून इतर कोणीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून हा मोबाइल तयार करू शकतो. हा मोबाइल बनविण्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रोहित सिंग, तन्मय िशदे, हितार्थ पटेल, नवनाथ माने, नितीन कलकेरी, राहुल कपूर, निमिष राजवाडे या सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन हा नवीन प्रयोग तयार केला आहे. हा मोबाइल तयार करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींना भेट दिली व त्यांची गरज समजावून घेतली. आपला शोध जास्तीत जास्त अंध व्यक्तींपर्यंत पोहोचावा व त्याचा त्यांना फायदा व्हावा हीच इच्छा ते व्यक्त करतात.

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले स्वस्त व अत्याधुनिक फर्मेटो यंत्र
औषधे, विविध प्रकारची पेये, खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत सूक्ष्मजीवांचा उपयोग करून उत्पादने घेतली जातात. यासाठी प्रयोगशाळांमध्ये फर्मेटेशन या प्रक्रियेद्वारे आवश्यक सूक्ष्मजीवांची निर्मिती करून त्यांचा वापर केला जातो. यात फर्मेटर या साधनाचा उपयोग करून सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. साधारणपणे सत्तर हजारांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत हे साधन विकत मिळते. पण आता डोंबिवली येथील सरस्वती विद्या भवन फार्मसी महाविद्यालयाच्या गायत्री पोटेकर व वंदना यादव या विद्यार्थिनींनी अत्याधुनिक व स्वस्त फर्मेटर यंत्राची निर्मिती केली आहे. मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, फार्मसीसारख्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना नेहमीच फर्मेटेशनचा प्रयोग करावा लागत असतो. पण त्यासाठी आवश्यक असणारे फर्मेटर हे यंत्र त्याच्या किमतींमुळे सर्वच विद्यार्थ्यांना नेहमीच उपलब्ध होत नसते. तसेच हे यंत्र वापरताना विद्यार्थ्यांना अनेकवेळा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असते. परंतु गायत्री पोटेकर व वंदना यादव या विद्यार्थिनींच्या कल्पनेतून तयार झालेले फर्मेटो हे साधन पारंपरिक फर्मेटरच्या किंमत व गुंतागुंतीची कार्यपद्धती या दोषांना दूर करणारे आहे. कारण या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या फर्मेटोची किंमत अवघी पाच हजार इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे यंत्र आता सहज उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय तापमान नियंत्रण, विजेचा कमीतकमी वापर, पीएचचे नियमन या वैशिष्टय़ांसहित स्थायू व द्रव, ऑक्सी व विनॉक्सी श्वसन अशा दोन्ही अवस्थांमध्ये यात सूक्ष्मजीवांची वाढ करता येऊ शकते. त्यामुळे हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे व सुलभ आहे. फर्मेटेशन प्रयोगासाठी तयार करण्यात आलेल्या या यंत्रामुळे विद्यार्थ्यांना आता संशोधनासाठी स्वस्तात व दर्जाबाबत कोणतीही तडजोड नसलेले फर्मेटर वापरता येणार आहे. आता या यंत्राच्या पेटंटसाठीही या विद्यार्थिनी प्रयत्न करत आहेत. काही गुंतवणूकदारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून लवकरच हे यंत्र सर्वाना बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे.

हेल्मेटला ह्य़ुमन बॉडी सेंसर
सध्या राज्यभरात हेल्मेटसक्तीने जोर धरला असताना हेल्मेट घातल्याशिवाय वाहन सुरू होणार नाही असे अनोखे तंत्र भोसला सनिकी महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील अमेय नेरकर याने शोधून काढले आहे. याबरोबर अमेयने नव्याने यामध्ये अल्कोहोल सेंसरदेखील बसवले आहे. आज अपघातांमध्ये डोक्याला मार लागून मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र कायदा करूनदेखील वाहनचालक हेल्मेट घालण्यासाठी निष्काळजीपणा करीत असल्याचे पाहायला मिळते. मात्र यावर अतिशय योग्य उपाय या बारावीतील अनेयने शोधून काढला आहे. वाहन व हेल्मेट यांच्यात अमेयने ह्य़ुमन बॉडी सेंसर बसविले आहे. हेल्मेट घालून बेल्ट लावल्याशिवाय वाहन सुरू होत नाही तर वाहन सुरू असताना बेल्ट किंवा हेल्मेट काढल्यास वाहन बंद पडते. दुचाकीमध्ये हे तंत्र बसविण्यासाठी फक्त तीनशे रुपये खर्च येतो. याबरोबरच नव्याने अल्कोहोल सेंसर बसविल्यामुळे मद्यपान केल्यावर वाहन सुरू होणार नाही अशी व्यवस्था त्याने केली आहे. या प्रयोगशील वाहनाचा अपघात झाल्यास पोलीस, रुग्णवाहिका व कुटुंबातील नातेवाईकांना तात्काळ संदेश पाठवून माहिती दिली जाऊ शकते. दहावीत असताना अमेयने संशोधनास सुरुवात केली. शालेय जीवनात त्याने हे मॉडेल तयार केले. त्याने स्वत:च्या दुचाकीला हे यंत्र बसवून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या कर्तृत्वासाठी मला माझ्या वडिलांनी मदत केली असल्याचे तो सांगतो.

पराग महाविद्यालयाच्या यश हजारेने बनवले ई-हेल्मेट
एकीकडे हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीस्वारांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत असतानाच भांडुप येथील पराग कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत असलेल्या यश हजारे या विद्यार्थ्यांने मात्र आगळेवेगळे हेल्मेट तयार केले आहे. जोवर दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही तोपर्यंत दुचाकी सुरूच होणार नाही, अशी सोय या उपकरणात करण्यात आली आहे. भारतातील दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व हेल्मेट न घातल्याने अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालावेच यासाठी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या यशने रेडिओ लहरींचा वापर करत हे आगळे हेल्मेट तयार केले आहे. यासाठी त्याने हेल्मेटमध्ये रेडिओ लहरी प्रक्षेपित करणारा प्रक्षेपक बसवला असून दुचाकीमध्ये या लहरींना ग्रहण करणारा ग्राहक बसवला आहे. हेल्मेट घातल्यावर त्यात असणारे पुश बटन आपोआप दाबले जाऊन रेडिओ लहरी बाहेर पडतात. त्यानंतर या लहरी ग्रहण करताच दुचाकीच्या हॅण्डलवर बसवलेला एलईडी बल्ब सुरू होऊन गाडी सुरू होते. तर हेल्मेट काढताच दुचाकीचा वेग कमी होऊन ती बंद होते. त्यामुळे दुचाकीस्वाराला गाडी चालवताना हेल्मेट घालावेच लागणार आहे. त्याने या उपकरणाला ई-हेल्मेट असे नाव दिले आहे. नुकत्याच झालेल्या भांडुप येथील एनईएस स्टार्टअप फेस्टिवलमध्ये त्याला यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे. या उपकरणात त्याला आणखी काही बदल करायचे असून यासाठी गुंतवणूक मिळाल्यास त्याला हे हेल्मेट व्यापक स्तरावर न्यायचे आहे.