केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या समाजकल्याण आणि सशक्तीकरण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांना देणाऱ्या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या दोन हजार असून यापैकी ६०० शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. ५०० शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक वा तंत्रज्ञानविषयक उच्च शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक पात्रता : २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षांत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत –
०    अर्जदारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांहून अधिक नसावे.
०    योजनेंतर्गत अर्ज करणारे विद्यार्थी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.
उपलब्ध शिष्यवृत्ती व लाभ : योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती व लाभ उपलब्ध होतील –
०    विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी संबंधित शैक्षणिक सत्रात दरमहा २,५०० रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दरमहा ३,००० रु.ची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरता पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी ६ हजार रु. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरवर्षी १० हजार रु. देण्यात येतील.
० याशिवाय असे विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्यास त्यांना दरमहा ७०० रु. तर इतरांना दरमहा ४०० रु. अतिरिक्त देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : या योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीची जाहिरात पाहावी अथवा नॅशनल हॅण्डीकॅप्ड फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या http://www.nhfdc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१४.