आजपर्यंत उत्तम संशोधन केलेल्या किंवा करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचं काम म्हणावं तसं शाळकरी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचताना दिसत नाही. मुलींना प्रेरक ठरावं असं रोल मॉडेल त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी शिक्षण पद्धती म्हणा किंवा ‘मीडिया’ म्हणा.. कदाचित म्हणावा तितका प्रभावी ठरत नाही. तसेच अनेकदा कुटुंबीयांचा पािठबाही कमी मिळतो. म्हणूनच आजही वैज्ञानिक क्षेत्रात स्त्रियांचं म्हणावं तितकं योगदान नाही.
– १० नोव्हेंबरच्या जागतिक विज्ञान दिनानिमित्त स्त्री वैज्ञानिकांची गरज सांगणारा लेख.
गोष्ट १९३३ सालची ! आपल्या देशातल्या बेंगळुरू शहरातल्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या संशोधन संस्थेत एक विलक्षण घटना घडली. नऊवारी साडी नेसलेली, व्यवस्थित चापूनचोपून केस िवचरलेली एक बुद्धिमान तरुणी आपल्या पित्याबरोबर, या संस्थेत संशोधन करण्यासाठी प्रवेश घ्यायला आली होती आणि ‘ती मुलगी आहे’ या कारणास्तव संस्थेचे संचालक, चक्क तिला प्रवेश नाकारत होते. पण विज्ञानातच संशोधन करायचं या आपल्या निर्णयावर ठाम असलेली ‘ती’ मुलगी. कमला. प्रवेश घेतल्याशिवाय तिथून उठलीच नाही. प्रवेश देण्यासाठी संचालकांनी घातलेल्या अटी मान्य करीत आणि नंतरची २-३ वर्षे अपार मेहनत करीत, कमलाने संचालकांची मर्जी तर संपादन केलीच; शिवाय जीव-रसायनशास्त्राच्या संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. पुढे केंब्रिजला जाऊन उच्च विद्याविभूषित होऊन, आपल्या मायदेशी परत आल्यावर डॉ. कमला सोहोनी यांनी अनेक प्रकारचं लोकोपयोगी संशोधन करीत, मुंबईतल्या विज्ञान संस्थेचं संचालकपदही भूषवलं!
आज डॉ. कमला सोहोनींची आठवण काढण्याचं निमित्त आहे ते जागतिक विज्ञान दिनांचं! १० नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच त्या निमित्ताने आपल्या दैनंदिन जीवनातल्या विज्ञानाचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मानवाचं जीवन सुखकर होण्यासाठी ज्यांनी विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात योगदान दिलं आहे, त्यांचं स्मरण केलं जातं. ज्यामध्ये अनेक भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा मोलाचा सहभाग आहे. आणि म्हणूनच त्या निमित्ताने  ‘भारतीय स्त्री वैज्ञानिक’ या विषयाचा हा परामर्श.
तसं आपल्या सर्वानाच आपल्या रोजच्या आयुष्यात असलेल्या ‘विज्ञाना’च्या स्थानाविषयी कल्पना आहे किंवा आपण कोणीच ‘विज्ञाना’तल्या संशोधनाचं महत्त्व नाकारत नाही; पण जसा शिवाजी शेजाऱ्यांच्या घरात जन्माला यावा असं आपल्याला वाटतं तसंच संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार ‘मूल’ही आपल्या आजूबाजूच्या कोणाचं तरी असावं. पण आपल्या ‘हुशार’ मुलाने मात्र इंजिनीयर, डॉक्टर किंवा सीए व्हावं अशीच मानसिकता आजही आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात आहे.. आणि त्यातल्या त्यात संशोधनाकडे वळणाऱ्या ‘मुली’ ही गोष्ट आजच्या घडीलादेखील विरळाच म्हणावी लागेल.
शाळकरी विद्यार्थ्यांना (फार कशाला, शिक्षकांनादेखील) १० भारतीय वैज्ञानिकांची नावं सांगा, असा एखादा गुगली टाकून बघा! आणि अगदी हमखास विकेटच घायची असेल तर १० भारतीय महिला वैज्ञानिक सांगा, असं विचारा! १० तर सोडाच, पण कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स, या परदेशी, पण भारतीय वंशाच्या स्त्रियांची नावं सोडली; तर अक्षरश: एकही नाव विद्यार्थ्यांच्या ओठावर येत नाही.. ही खरंच खेदाची बाब आहे.
म्हणजे भारतात महिला वैज्ञानिक होत नाहीत की त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही? भारतात महिला वैज्ञानिक किंवा संशोधक होत नाहीत; असं म्हणताच येणार नाही. कारण डॉ. आदिती पंतांसारखी महिला संशोधक अंटाíक्टका मोहिमेवर जाणाऱ्या संशोधक पथकात सामील होते आणि एकदा नव्हे तर दोनदा या मोहिमेत भाग घेऊन मोलाचं संशोधन करते. डॉ. रजनी भिसेंसारखी एक स्त्री शास्त्रज्ञ, जिवाचं रान करीत, खेडोपाडी जात, विडीच्या कारखान्यांत काम करणाऱ्या तरुणांना आणि महिलांना होणाऱ्या कर्करोगावर संशोधन करते. कमल रणदिवेंसारखी ‘डायनामिक’ स्त्री कर्करोगावर संशोधनपर काम करणाऱ्या एका संस्थेच्या संचालकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळते. सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘कळवे’ गावची डॉ. चंदा जोग नावाची स्त्री अवकाशातल्या दीíघका आणि त्यात निर्माण होणारे तारकासमूह यावर जगभरात प्रशंसनीय ठरणारं काम करते. डॉ. मेधा खोलेंसारखी महिला वैज्ञानिक हवामानशास्त्र या विषयात उल्लेखनीय असं संशोधन तर करतेच, शिवाय वेधशाळेच्या संचालकपदाची धुराही यशस्वीरीत्या सांभाळते आहे.
नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन करणाऱ्या डॉ. दीप्ती देवबागकर, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये संशोधन करणाऱ्या डॉ. सुलभा पाठक, पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि पदार्थरचनाशास्त्र हे विषय शिकवणाऱ्या आणि त्याच विषयांमध्ये संशोधनही करणाऱ्या डॉ. संगीता काळे अशा एक नाही अनेक स्त्री शास्त्रज्ञांनी आजवर संशोधनपर काम केलंय आणि काही जणी तर अजून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कामाने जगभरात भारताची मान उंचावली आहे. तरीही प्रसिद्धीचं वलय त्यांच्याभोवती नाही. न्यूटन, एडिसन सोडाच, पण कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्सच्या वाटय़ाला आलेली प्रसिद्धीही या भारतीय महिला संशोधकांच्या किंवा त्यांच्या कार्याच्या वाटय़ाला आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि कदाचित त्यामुळेही असेल पण आजही करिअर म्हणून संशोधनाकडे वळण्यात भारतीय मुली मागे पडताहेत. वहिवाटेचं पाठय़पुस्तकीय विज्ञान-शिक्षण सोडलं तर संशोधन क्षेत्राच्या वर्गामध्ये मुलींची संख्या तुलनेने कमीच असते. यामागे काय कारण असावं, यावर जरा विचार करू या!
एकतर आत्ताच म्हटल्याप्रमाणे आजपर्यंत उत्तम संशोधन केलेल्या किंवा करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचं काम म्हणावं तसं शाळकरी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचत नाही आहे. मुलींना इन्स्पिरेशन वाटावं असं रोल मॉडेल त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी शिक्षणपद्धती म्हणा किंवा ‘मीडिया’ म्हणा.. कदाचित म्हणावा तितका प्रभावी ठरत नाही आहे. पण या नाण्याला दुसरीही बाजू आहे.
वर उल्लेखलेल्या सर्व स्त्रियांच्या यशस्वी होण्याची दुसरी बाजू आहे, ती म्हणजे त्यांना सातत्याने मिळणाऱ्या कुटुंबीयांच्या पािठब्याची! संशोधनाकडे वळणाऱ्या स्त्रीच्या पाठीशी, ‘तू हुशार आहेस, शहाणी आहेस, तेव्हा तुला आवडत असेल तर संशोधनाच्या क्षेत्राकडे जरूर जा’, असं सांगणारे आणि त्यानुसार सतत आपल्या लेकीला संशोधनाच्या क्षेत्रात सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर असलेले पालक जितके गरजेचे आहेत तितकेच ‘तू संशोधनाच्या क्षेत्रात जे काम करतेस ते समाजाच्या कल्याणासाठी फारच मोलाचं आहे; तेव्हा घराची, मुलांची जबाबदारी मी सांभाळतो’ असं मोठय़ा अभिमानाने सांगून, आपल्या पत्नीला खरोखरीच प्रोत्साहन देणारा पती आणि अन्य कुटुंबीयही महत्त्वाचे आहेत.
आदिती पंत यांच्या आईने एकदा आपल्या लेकीला अगदी ती नऊ वर्षांची असताना बटाटय़ाची भाजी, वरण आणि भात करायला लावला होता. आणि तोही सलग अनेक दिवस. आदिती त्यात तरबेज होईपर्यंत. आदिती पंत म्हणतात, ‘‘आईच्या या शिकवणीतून मी दोन गोष्टी शिकले, एक म्हणजे सराव केल्यानंतर कुठलीही गोष्ट उत्तम प्रकारे करता येते, किंवा तशी ती गोष्ट उत्तम प्रकारे जमेपर्यंत, निराश न होता काम करण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण होते.’’ आईचा मात्र लेकीला असा स्वयंपाक शिकवण्यामागे आणखी एक हेतू होता, तो म्हणजे.. जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी आदितीवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. आणि एकूणच हे सारं ट्रेिनग आदितीला तिच्या संशोधनाच्या कामाच्या काळात खूपच उपयोगी पडलं. अंटाíक्टका असो किंवा कुठलाही समुद्रकिनारा, आदितीला तिथं बराच काळ मुक्काम ठोकावा लागे आणि त्या काळात त्यांच्या पालकांनी दिलेली शिकवण खूप महत्त्वाची ठरली.
पण आदितीसारखं भाग्य साऱ्याच मुलींना लाभतं असं नाही. बऱ्याच वेळा आपल्या मुलीला संशोधनाच्या क्षेत्रात जाण्यासाठी आपण भले पािठबा देऊ; पण उद्या लग्न झाल्यावर पतीने तसाच सपोर्ट दिला नाही तर मात्र मग मुलीला काहीच करिअर राहणार नाही या विचारानेही भारतीय, विशेषत: ग्रामीण भागातील भारतीय मुलींना संशोधनाकडे वळण्यासाठी त्यांचे पालक प्रोत्साहन देत नसावेत. या साऱ्या विचारप्रवाहाची लहानपणीच नकळत झालेली जाणीव, पुढे भारतीय मुलीला ‘संशोधन’ क्षेत्राकडे जाण्यापासून परावृत्त करीत असावी.
आज आपल्या देशाला विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ताज्या दमाच्या आणि कल्पक विचारांच्या तरुण पिढीची नितांत गरज आहे. शेती, हवामान, रसायन, अवकाश, औषधं, पर्यावरण, हवामान, सागरी जीवन, पाणी, ऊर्ज एक ना दोन अनेक क्षेत्रांमध्ये नवनवी आव्हानं समोर उभी राहताहेत. आणि या साऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय स्त्रियादेखील अत्यंत सक्षम आहेत. फक्त आता या साऱ्या जणींनी कंबर कसायला हवी. आपल्या साऱ्या कुटुंबीयांना स्वत:ची जिद्द पटवून द्यायला हवी. आणि त्यांना तसं ते पटायला काही काळ लागत असला तरी स्वत:ची जिद्द न सोडता, थोडीशी तारेवरची कसरत करीत का होईना.. पण संशोधनाकडे वळायलाच  हवं.   
या वर्षीच्या जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण सारेच भारतीय या महत्त्वाच्या गोष्टीवर जबाबदारीने विचार करू या. विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय महिलांनी केलेली कामगिरी माहिती करून घेऊन, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू या. नवीन पिढीतल्या ‘विज्ञान कन्यांना’ चलो.. आगे बढो.. हम सब तुम्हारे साथ है. असा विश्वास देऊ या..! तरच डॉ. कमला सोहोनींची परंपरा जपणारी, जिद्दीने संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी, भारतीय महिला वैज्ञानिकांची पुढची फळी उभी राहील! आणि देशात वैज्ञानिक क्रांतीचे वारे व्हायला लागतील    
  chaturang@expressindia.com

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
IIIT Nagpur job hiring news marathi
IIIT Nagpur Recruitment 2024 : नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदावर होणार भरती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!