महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीच्या अभ्यासकांमध्ये रा. ना. चव्हाण हे महत्त्वाचे अभ्यासक आहेत. साक्षेपी व वस्तुनिष्ठ  मांडणी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़. आतापर्यंत त्यांच्या लेखनाचे ३२ संग्रह प्रकाशित करण्यात आले असून नुकताच ‘कर्मवीर भाऊराव पाटील- एक दर्शन’ हा त्यांच्या वैचारिक लेखांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. हा संग्रह म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र नव्हे. यात भाऊरावांच्या कार्याचेचिकित्सक विश्लेषण करणाऱ्या २४ लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हे लेख १९५९ ते १९९१ या कालखंडात लिहिलेले आहेत. यात भाऊरावांची जडणघडण, त्यांचे व्यक्तिमत्त्व यांविषयी जशी माहिती येते, तशीच त्यांच्या कार्यामागची पाश्र्वभूमी, रयत शिक्षण संस्थेची उभारणी यांबद्दलही माहिती येते. याशिवाय भाऊरावांच्या विचार व कार्यावर महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांचा असलेला प्रभावही अधोरेखित होतो. रा. ना. चव्हाण यांना भाऊरावांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. या सहवासातील काही आठवणीही या पुस्तकात वाचायला मिळतात. एकूणच हे पुस्तक भाऊरावांचे चरित्र नसले तरी त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा सखोल वेध घेणारे आहे. ‘कर्मवीर भाऊराव

पाटील- एक दर्शन’- रा. ना. चव्हाण,
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान,
पृष्ठे – ३०४, मूल्य – ३५० रुपये 

शब्दांनी साकारलेली पोट्र्रेट्स

रिल्के, ब्राऊनिंग, इलियट आदी कवींनी इंग्रजीत  व्यक्तिचित्रण करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत.  त्यांना ‘पोट्र्रेट पोएम्स’ असे म्हटले जाते. मराठी साहित्यातही अशा कवितांचा प्रयोग थोडय़ा फार प्रमाणात झालेला आहे. परंतु अख्खा कवितासंग्रहच अशा कवितांचा निघणे ही अनोखी घटना असेल. कवी विश्वास वसेकर यांचा ‘पोटर्र्ेट पोएम्स’ हा कवितासंग्रह हे त्याचेच उदाहरण. या संग्रहात एकूण ५५ कविता अर्थात शब्दांनी साकारलेली पोट्र्रेट्स आहेत. या कवितांमधून वसेकर यांनी आपल्या गुरुजनांची, मित्रांची तसेच  अमृता प्रीतम, गालिब, अण्णाभाऊ साठे, बा. भ. बोरकर, भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, दलाई लामा, नेल्सन मंडेला, इंदिरा गांधी आदींची पोट्र्रेट्स वाचायला मिळतात. साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण यांसारख्या निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींवर लिहिलेल्या या पोट्र्रेट कविता हा मराठी कवितेतील अनोखा सृजन-प्रयोग आहे.

 ‘पोट्र्रेट पोएम्स’- विश्वास वसेकर,
संस्कृती प्रकाशन,
पृष्ठे- १४४, मूल्य- १५० रुपये