मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर साागरी किनाऱ्याचे संरक्षण करण्याकरिता १५० जहाजे व १०० विमाने इ.स. २०२० पर्यंत मिळणे आवश्यक आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक अनुराग जी थापलियाल यांनी वार्ताहरांना सांगितले की, २६/११ च्या हल्ल्याने स्वजागरूकता यायला हवी. आपली किनारपट्टी सुरक्षित मानली जात असताना आपल्याला अशा हल्ल्याची कल्पनाही नव्हती पण त्या घटनेने आता आपण जागे झालो आहोत. सागरी सुरक्षेचे विश्लेषण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते ते तयार करून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. तट केंद्रे, किनारी रडार मालिका बसवण्यात आली असून मनुष्यबळही वाढवले आहे. आज आमच्याकडे अकरा हजार जवान आहेत व ६५ जहाजे होती ती आता १०० आहेत. आणखी नव्वद जहाजे वेगवेगळ्या गोदीत तयार केली जात आहेत. २०२० पर्यंत १५० जहाजे व १०० विमाने असावीत अशी अपेक्षा आहे. दोन इंजिनांची विमाने आवश्यक आहेत तसेच किनाऱ्यावरून काम करणारी विमानेही हवी आहेत.भारतीय किनाऱ्यावर अडीच लाख बोटी आहेत. त्यातील ८० हजार रोज सागरात असतात त्यांची तपासणी आवश्यक असली तरी ती शक्य नाही. आता या बोटींना कोडिंग व टॅगिंग केले आहे व त्यामुळे अतिरेक्यांनी ट्रॉलर पळवण्याची शक्यता नाही. मच्छिमारांना ओळखपत्रे सक्तीची केली आहे. केंद्राच्या मदतीने त्यांना त्यांची माहिती देणारे एकच बहुउपयोगी कार्ड दिले पाहिजे, त्यांचे आधारकार्डही त्याला जोडले पाहिजे. मच्छिमारांना त्यांच्या बोटीवर ट्रॉन्सपाँडर लावण्यास सांगण्यात आले.