जम्मू-काश्मिरमधील सीमाभागात मागील अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांची घुसखोरी चालूच आहे. यातच आज (रविवारी) सैन्याने केलेल्या कारवाईत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. सीमाभागातील कारवाईदरम्यान हा दहशतवादी ठार झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

जम्मू काश्मिरच्या पूंछ भागात भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत हा घुसखोर ठार झाला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे २.३० वाजता करण्यात आली होती. यामध्ये हा घुसखोर ठार झाल्याचे सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनिष मेहता यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या शीख बटालियनने पहाटे ही कारवाई केली. गेल्या २४ तासांमध्ये सैन्याकडून दहशतवादाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत १० सशस्त्र घुसखोर ठार झाले आहेत. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर सबझार भट याचाही समावेश असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.

रमजानच्या महिन्यात जम्मू आणि काश्मिर भागात अशांतता पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून अशापद्धतीने घुसखोरी केली जात असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात येत आहे. सीमारेषेवर दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांवर कठोर कारवाई कऱण्यासाठी सीमेवरील सैन्यकडून अतिशय कठोर पाऊले उचलली जात असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले आहे.