खोटय़ा आयातीच्या नावाखाली बँक ऑफ बडोदा मार्फत सहा हजार कोटींचा काळा पैसा हाँगकाँगमध्ये नेल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) ५० ठिकाणी छापे टाकून काही संशयितांचे जाबजबाब घेतले आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, संबंधित ५९ खातेदार कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या आयात व्यवहाराच्या नावाखाली खोटय़ा पत्त्यावर पैसे पाठवले होते. यातील काही प्रमुख संशयितांचे जाबजबाब सीबीआयच्या मुख्यालयात घेण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणी कलम १२० बी (गुन्हेगारी कट) कलम ४२० (फसवणूक) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम १३(२) व १३ (१)डी अन्वये काही चालू खाती बाळगणारे खातेदार व अज्ञात बँक अधिकारी यांच्यावर कारवाई केली. बँक ऑफ बडोदानेच याबाबत तक्रार दिली होती.
प्राथमिक माहिती अहवालात असे म्हटले आहे की, ५९ चालू खातेदार व अज्ञात बँक अधिकारी यांनी हाँगकाँग व परदेशात ६ हजार कोटींची रक्कम बँकिंग नियमांचा भंग करून पाठवली. अस्तित्वात नसलेल्या आयात व्यवहारात ती पाठवली गेली. सक्तवसुली संचालनालयाने तक्रार दाखल केली असून शोध मोहीम चालू आहे.
काँग्रेसनेही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. काजू, डाळी व तांदूळ खरेदीसाठी हा पैसा पाठवण्यात आला ही बाब चमत्कारिक आहे, असे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बनावट कंपन्यांच्या नावे ५९ खाती
बँकेने केलेल्या अंतर्गत हिशेब तपासणीत अशोक विहार येथील शाखेत ८००० संशयित व्यवहार दिसून आले होते. जे खातेदार हाँगकाँगला पैसे पाठवित होते, त्यांनी काजू, तांदूळ आयातीसाठी पैसे पाठवित असल्याचा दावा केला. या रकमा १ लाख डॉलरच्या खाली आणीत विभागून पाठवल्या जात होत्या, त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये ते लक्षात येत नव्हते. स्मर्फिग म्हणजे कुठलेही व्यवहार छाननीत येणार नाहीत अशा तंत्राने हा गैरव्यवहार करण्यात आला. कंपन्यांची नावे, खोटे पत्ते आणि कोटय़वधींची रक्कम अशा पद्धतीने ही ५९ खाती उघडली गेली होती.