महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ातील आरोपींना फासावर लटकविण्याचे अथवा गोळ्या घालून ठार मारण्याचे अधिकार जर घटनेने दिले तर दिल्ली पोलीस ते अधिकार पूर्ण क्षमतेने जागीच अमलात आणतील, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
दिल्लीत महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, त्या संदर्भाने ते दिल्ली पोलिसांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्ली पोलीस दिल्ली सरकारला उत्तर देण्यास बांधील नाहीत हे ‘सुदैव’ असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.
जनतेने मागणी केल्यानुसार आम्ही कारवाई करू शकत नाही. लोकशाही समाजव्यवस्थेत आम्हाला कायद्याचे पालन करून कारवाई करावी लागते, अन्यथा समाजव्यवस्थाच कोलमडून पडेल, असेही बस्सी म्हणाले.
प्रत्येक मुलीला किमान तीन आरोपींना लोळविता आले पाहिजे इतपत त्यांनी प्रशिक्षित व्हावयास हवे, असेही ते म्हणाले.