आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सोमवारी हवेतील मिग विमानातून इंधन टाकी खाली जमिनीवर पडल्याची दुर्घटना घडली. विशाखापट्टणम येथील सीआयएसएफ क्वाटर्समध्ये हा प्रकार घडला. सूत्रांच्या माहितीनुसार, नौदलाचे मिकोयान मिग-२९के  हे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावताना हा प्रकार घडला. यावेळी चुकीने विमानातून रिकामी इंधन टाकी खाली सोडण्यात आली. त्यामुळे धावपट्टीवर आग लागली. मात्र, ही आग किरकोळ असल्यामुळे लगेच आटोक्यात आणली गेली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, नौदलाकडून याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे समजत आहे.