गेल्या काही वर्षांपासून नेहमी रेल्वेच्या तोट्याचीच चर्चा होताना दिसते. परंतु, यंदा मात्र हे चित्र बदलल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी उत्पन्न नोंदवले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात रेल्वेने विविध माध्यमातून १.६८ लाख कोटी रूपये कमावले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सुरू केलेल्या विविध योजनांना प्रतिसाद मिळत असल्याचेच हे द्योतक आहे.

३१ मार्च रोजी संपलेल्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने १.०९४ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्षात १.१०७ अब्ज टन मालाची वाहतूक केली गेली. आता २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षासाठी १.२ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. २०१६-१७च्या प्रारंभी रेल्वेची मालवाहतूक आणि प्रवासीसंख्या यांच्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती
प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उत्पन्न वाढीसाठी अनेक निर्णय घेतले. योग्य पावले उचलले. निर्णयांची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे रेल्वे सुस्थितीत आली, असे मत प्रभू यांनी नोंदवले.
गतवर्षी (२०१५-१६) प्रवासी भाड्यातून रेल्वेला दोन हजार कोटी तर यावर्षी (२०१६-१७) तब्बल ४८ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
मागीलवर्षी मालवाहतुकीतून मिळालेल्या १.०४ लाख कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा १.०९ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
उत्पन्नवाढीसाठी खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांमागे उत्पन्नाचे प्रमाण ९५ टक्के आहे. २०१५-१६मध्ये हे प्रमाण ९४ टक्के होते.
भंगार विकून, जाहिरातींचे हक्क विकून तसेच अन्य स्रोतांपासून रेल्वेला ११ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले.