संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीश कुमार आज संध्याकाळी राजभवानात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता. मात्र, तेजस्वी यादव कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत, अशी भूमिका लालू प्रसाद यादव यांनी घेतली होती. आजदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर नितीश कुमार यांनी थेट मुख्यमंत्रिपद सोडून सर्वांनाच धक्का दिला. त्यांचा हा निर्णय भाजपविरुद्ध विरोधकांच्या एकतेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामागे काय कारणे आहेत, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे:

* राष्ट्रीय राजकारणात एक स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून नितीश कुमार यांची ओळख आहे. आपली ही प्रतिमा जपली जाईल, याची पूर्ण काळजी नितीश नेहमीच घेत आले आहेत.

* बिहारमध्ये दहा वर्षे भाजपसोबत सत्तेत असताना नितीश यांनी आपल्या कारभारात कोणालाही हस्तक्षेप करून दिला नव्हता. त्यावेळी भाजपनेही आपल्या मर्यादा ओळखून नितीश यांच्या हातात सर्व सूत्रे दिली होती. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने बाहेरून पाठिंबा दिला तरी नितीश यांना आपल्या पद्धतीने सरकार चालवता येईल.

* याउलट, लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केल्यानंतर उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांची सरकारच्या कारभारातील ढवळाढवळ वाढली होती. नितीश कुमारांना ही बाब बिलकूल पसंत नव्हती.

* बिहारच्या राजकारणाचा इतिहास पाहता मुळातच संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाची युती अनैसर्गिक युती असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे ही युती किती काळ टिकेल, याबाबत सर्वांनाच साशंकता होती. मध्यंतरी अनेक मुद्द्यांवरून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यातील वितुष्ट दिसून आले होते. अखेर पाणी डोक्यावरून जाऊ लागल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला.

* गेल्या काही काळात भाजप आणि जेडीयू यांच्यातील वाढत्या स्नेहामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: नितीश यांनी नोटाबंदीच्या आणि अन्य निर्णयावरून भाजपची पाठराखण केली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील जवळीक वाढली होती.

* २०१९ मधील निवडणुकीत भाजपसमोर टिकणे हे सद्यस्थितीत अवघड आहे हे नितीश कुमार यांनी जोखले होते. आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नसल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आपली पुढची चाल खेळली आहे. त्यांना बिहारच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहून कार्यरत राहण्यात जास्त आनंद आहे.