देशभरात आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर मागे  ३ रुपये ३८ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे २ रुपये ६७ पैशांनी वाढ केली आहे.

गेल्या पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल पाच डॉलर्सनी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केलेत. बुधवारी मध्यरात्री पासून पेट्रोल आणि डिझेलते नवे दर लागू होणार आहेत.

१५ ऑगस्ट रोजी कंपन्यांच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. डिझेलचे दर प्रति लीटर २ रुपये आणि पेट्रोलचे दर प्रति लीटर १ रुपयाने कमी कऱण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत वाढत असल्याने त्याचा परिणाम भारतावरही दिसून येईल असे पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिका-यांनी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल आणि त्याचा परिणाम भाजीपाल्यापासून ते दररोजच्या प्रवासावर दिसून येईल.  केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारीत किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. गेल्या दोन महिन्यात देशभरात चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ग्राहकांना दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.