पीएसएलव्ही सी २० हा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक येत्या २५ फेब्रुवारीला सात उपग्रहांसह अवकाशात झेपावणार आहे. त्यात सरल या इंडो-फ्रेंच उपग्रहाचाही समावेश आहे. आज सकाळी सहा वाजून छपन्न मिनिटांनी या प्रक्षेपकाची उलटगणती सुरू झाली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा प्रक्षेपक सोडला जाणार आहे.
प्रक्षेपण अधिकार मंडळाने याअगोदर असे निश्चित केले, की येथून ९० कि.मी अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा येथून २५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून ५६ मिनिटांनी हे उड्डाण होईल. पीएसएलव्ही सी २० हा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक प्रकारातील तेविसावा प्रक्षेपक असून त्याच्या मदतीने इंडो-फ्रेंच बनावटीचा ४०० किलोचा एक उपग्रह व इतर सहा उपग्रह कक्षेत सोडले जाणार आहेत. सॅटेलाइट्स विथ अरगॉस अँड अलटिका म्हणजे सरल हा उपग्रह अरगॉस व अलटिकामीटर यांच्या मदतीने महासागरांचे विश्लेषण करणार आहे. या प्रक्षेपकाच्या मदतीने इतर सहा उपग्रह सोडले जाणार असून त्यात कॅनडा व ऑस्ट्रिया यांचे प्रत्येकी दोन तर डेन्मार्क व ब्रिटनचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या समवेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे श्रीहरिकोटा येथून होणारे हे उड्डाण पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.