रोजगार निर्मितीच्या मुद्यावर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. रोजगार निर्मितीत काँग्रेस सरकारदेखील अपयशी ठरले होते, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. मात्र या प्रश्नावर काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकार अधिक अयशस्वी ठरल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्कमधील प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध मुद्यांवर भाष्य केले. नोकऱ्या, रोजगाराच्या संधी या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. याआधी राहुल गांधी यांनी बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. प्रिन्स्टन विद्यापीठात बोलताना रोजगारासह शिक्षण आणि आरोग्याच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. शिक्षण आणि आरोग्यविषयक गरजांवर कमी केला जाणारा खर्च चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले.

‘रोजगाराची समस्या अतिशय गंभीर आहे. जर तुम्ही देशातील तरुणांना रोजगार देऊ शकत नसाल, तर तुम्ही त्यांना व्हिजनदेखील देऊ शकत नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘दररोज ३० हजार तरुण रोजगारासाठी सक्षम होतात. मात्र त्यातील केवळ ४५० तरुणांनाच रोजगार मिळतो. मोदींच्या मेक इन इंडियामध्ये मोठ्या उद्योगपतींना प्राधान्य दिले जाते. त्याऐवजी लघू उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे,’ असे ते म्हणाले.

धुव्रीकरणाचे राजकारण देशासमोरील गंभीर संकट असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘जगाकडे पाहण्याचा सुस्पष्ट असा दृष्टीकोन चीनकडे आहे. तसा दृष्टीकोन आपल्याकडे आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीन अतिशय ताकदीने पुढे जातो आहे. त्या तुलनेत आपण कुठे आहोत?, आपल्याकडे यासाठीची दूरदृष्टी आहे का?, असेही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. याआधी राहुल गांधींनी बर्कले विद्यापीठात भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी देशात भीती आणि द्वेषाचे वातावरण असल्याची टीका केली होती.