गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या नाट्यावर एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीनंतर पडदा पडेल असे वाटत असतानाच हे प्रकरण एक नवे वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रशेखरन यांच्या टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री हे न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात टाटा कन्सलटंसी सर्व्हिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांची नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. दोन महिन्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर, रतन टाटा हे कामकाज पाहत होते.

टाटा सन्सच्या संचालकांनी चंद्रशेखरन यांची निवड केली. त्यांची निवड ही बेकायदेशीर आहे असे पत्र सायरस मिस्त्री यांनी टाटांच्या संचालक मंडळाला लिहिले असल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिले आहे. मला अचानकपणे अध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आलेले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी लवादाकडे आहे. त्यामुळे एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती बेकायदा असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

सायरस मिस्त्री यांना पदावरुन काढून टाकण्यात आले तरी ते अद्याप टाटा सन्सच्या संचालक मंडळामध्ये आहे. याआधी झालेल्या बैठकीमध्ये मिस्त्री गैरहजर होते. त्या ऐवजी त्यांनी पत्र लिहून आपले विचार मांडले आहेत. सायरस मिस्त्रींना संचालक मंडळावरुन काढून टाकण्यात यावे याकरिता ६ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे.

मिस्त्रींना पदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादाकडे धाव घेतली. कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रशासन कसे असावे, त्यांनी नैतिकतेची कुठली बंधने पाळावीत याचा निकाल लागावा याच उद्देशाने मी टाटा सन्सच्या विरोधात एनसीएलटीमदध्ये याचिका दाखल केल्याचे मिस्त्रींनी म्हटले होते.

मी केवळ रतन टाटांच्या विरोधात नसून या व्यवस्थेच्या विरोधात लढा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. टाटा समुहात सायरस मिस्त्री कुटुंबियांचे सुमारे १८ टक्के शेअर्स आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून मिस्त्री कुटुंबीय हे टाटा सन्स समुहातील सर्वात मोठे वैयक्तिक समभागधारक आहे. टाटा आणि तुमच्यामध्ये समेट होण्याची शक्यता आहे का असे विचारले असता त्यांनी ही शक्यता नाकारुन लावली. मी एका मोठ्या उद्दिष्टासाठी हे करीत आहे त्यांनी म्हटले. कॉर्पोरेट क्षेत्रात स्वच्छ कारभार चालावा काही लोकांची मनमानी तेथे चालू नये यासाठी मी ही याचिका दाखल केली आहे असे मिस्त्री यांनी म्हटले.