पोलीस यंत्रणा जर राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकत नसेल, तर मग संघाच्या स्वयंसेवकांना शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्या, अशी मागणी भाजपचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एस. सुरेश कुमार यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश आर. यांची अज्ञातांनी हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरेश कुमार यांनी ही मागणी केली.
रुद्रेश कुमार यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंगळुरूमधील शिवाजीनगर येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी बोलताना सुरेश कुमार म्हणाले, जर संघाच्या स्वयंसेवकांची काळजी घेण्यास कर्नाटक पोलिसांना जमत नसेल, तर त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना स्वतःसोबत शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी. कुट्टप्पा, प्रवीण पुजारी, राजू आणि आता रुद्रेश या सर्व संघ स्वयंसेवकांच्या हत्येमुळे पोलीस कार्यकर्त्यांची सुरक्षेची काळजी घेऊ शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आम्ही पोलीस आयुक्तांकडे आम्हाला शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. आम्हाला कोणाच्या तरी हल्ल्यात मृत्युमुखी पडायचे नाही. आम्ही योद्धे आहोत. आम्हाला लढायचे आहे. त्यामुळे स्वतःची सुरक्षा कशी करायची हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पोलिसांनी केवळ आम्हाला शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणि भाजपच्याही नेत्यांनी सुरेश कुमार यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही.
केरळ आणि तामिळनाडूमध्ये अशाच पद्धतीने संघाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून मारण्यात येते आहे. आता तोच प्रकार कर्नाटकातही सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये केरळसारखी स्थिती येण्याअगोदरच पोलिसांनी आवश्यक उपाय केले पाहिजेत, अशीही मागणी सुरेश कुमार यांनी यावेळी केली.