भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिणेतील तिरूपती बालाजी मंदिर समितीला प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूमुळे १४० कोटींहून अधिकचा तोटा होत आहे. माफक दर आणि काही भक्तांना मोफत लाडू वाटण्यामुळे हे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. मंदिरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरूपती देवस्थानाने (टीटीडी) मागील ११ वर्षांपासून प्रति लाडू २५ रूपये या माफक दराने विकला जातो. वास्तविक हा लाडू तयार करण्यासाठी ३२.५० रूपये इतका खर्च होतो.

तिरूमला येथे मंदिरानजीक एका भल्या मोठ्या स्वंयपाक घरात बनवल्या जाणाऱ्या या लाडूंना भक्तांकडून मोठी मागणी आहे. हे लाडू देशातील विविध भागात जातात. वर्ष २०१६ मध्ये सुमारे १० कोटी लाडू विकली गेली. माफक दरामुळे लाडूची मोठयाप्रमाणात विक्री होते. त्याचबरोबर निशूल्क दर्शन करणारे आणि अनेक तास रांगेत उभारून प्रतिक्षा करणाऱ्या भक्तांना १० रूपये दराने हे लाडू दिले जातात. यामुळे सुमारे २३ कोटी रूपयांचे नुकसान होते. त्याचबरोबर ११ किलोमीटर चालत येणाऱ्या भक्तांना एक-एक लाडू मोफत देण्यात येते. त्यामुळे वार्षिक सुमारे २२.७ कोटी रूपयांचे नुकसान होते.
या डोंगरावर चालत येण्याची प्रथा सुरू राहावी यासाठी ही योजना ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर वार्षिक सुमारे ७० लाख लोक डोंगर चढून पायी मंदिरात दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर दर्शनासाठी ३०० रूपये देणारे आणि व्हीआयपी दर्शनासाठी ५०० रूपये देणाऱ्या सुमारे ७० लाख भक्तांना दोन लाडू मोफत देण्यात येतात. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिर प्रशासनाला लाडूच्या किमती वाढवायच्या नाहीत. एखादावेळी मोफत लाडूंची संख्या कमी केली जाऊ शकते. सुमारे १०० वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या काळापासून प्रसादाच्या स्वरूपात लाडू देण्यास सुरूवात झाली.