नोईडातील सराफाबाद येथे दोन महिन्यांत विषाणुजन्य तापाने १० जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हा प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे. सराफाबाद येथे नव्याने स्थापन केलेल्या आरोग्य छावणीत ११५० जणांना दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांत तापाचे रुग्ण वाढले आहेत. सांडपाण्याची अपुरी व्यवस्था व संसर्ग यामुळे तापाचा प्रादुर्भाव वाढल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एस. सी. गुप्ता यांनी सांगितले. दोन महिन्यांत दहाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. साथीच्या आजारानंतर जिल्हा दंडाधिकारी एन. पी. सिंग यांनी आरोग्य खाते व आयएमए यांना या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले आहे. दंडाधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या रजा रद्द करून त्यांना सराफाबाद येथे आरोग्य केंद्र सुरू करण्यास सांगितले. डासांच्या अळय़ांना प्रतिबंध करणारी औषधे फवारण्याचे आदेश दिले असून, वेगवेगळय़ा खेडय़ात फवारणी केली जाणार आहे. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र हा विषाणुजन्य ताप असल्याचे म्हटले आहे.