पावसाचा पत्ता नसला तरी अनेक बाइकप्रेमींनी आपली लाडकी बाइक पावसात भिजू नये यासाठी आधीच काळजी घेतली आहे. त्यात मग ओडोमीटरला कव्हर लाव, मडगार्डला कव्हर लाव, स्टार्टरच्या बटनात पाणी जाऊ नये यासाठी त्याला प्लास्टिक लाव, पेट्रोलच्या टाकीत पाणी जाऊ नये यासाठी तिच्या झाकणाला प्लास्टिक गुंडाळ अशा नानाविध प्रकारच्या खबरदाऱ्या बाइकप्रेमींनी घेतली असेल. मात्र, तरीही पावसाळ्यात गाडी बंद पडण्याचा अनुभव एकदा तरी येतोच. एवढी काळजी घेऊनही गाडी कशी बंद पडते, असा सवालही उपस्थित केला जातो. मात्र, प्रत्येकवेळी आपलीच चूक असते असे नाही. पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळेही असे घडू शकते..
पावसाळा म्हटला की मोटारसायकलची काळजी घेण्याचा आपण हरतऱ्हेने प्रयत्न करतो. दररोज स्वच्छता करणे, गंज चढू नये याकरिता गंजरोधक लावणे, चैनसेट साफ ठेवणे, इंजिनवर पाणी किंवा चिखल उडू नये म्हणून गार्डजवळ पुठ्ठा लावणे आदी प्रकारची काळजी आपण घेतो. या पावसाळ्यात आणखी एक डोकेदुखी मोटरसायकस्वारांना सतावत आहे. ती म्हणजे पेट्रोलच्या टाकीत पाणी होणे.
केंद्र सरकारने साखर कारखानदारांच्या रेटय़ामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला. २५ मार्चपासून इथेनॉलमिश्रित पेट्रोल पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. यात सरकारचाही फायदा व आपलाही. इथेनॉल मिसळल्यामुळे इंधन वाचते, सरकारची गंगाजळी वाचते. हे जरी खरे असले तरी याचा दुष्परिणाम मोटारसायकलस्वारांना पावसाळ्यात भोगावा लागतो.
पावसाळ्यात बऱ्याच मोटरसायकली उघडय़ावरच उभ्या असतात. यामुळे पेट्रोलच्या टाकीत पाणी जाते. त्यातच इथेनॉलमिश्रित पेट्रोल टाकीत असते. यामुळे पाण्याची व इथेनॉलची रासायनिक प्रक्रिया होऊन इथेनॉल पेट्रोलपासून विलग होते. याची परिणती इथेनॉलचे पाण्यात रूपांतर होण्यात होते. यामुळे फक्त पेट्रोल बाजूला होते. पेट्रोल हे पाण्यापेक्षा हलके असल्याने ते वर तरंगते. जेवढे पेट्रोल भरत जातो तेवढे इथेनॉलचे पाणी होते व दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत जाते. पेट्रोलची पातळी दाखविणारा काटा खाली येत नसल्यामुळे वाहनचालक निर्धास्त होतो. मात्र गाडी मध्येच कुठे तरी बंद पडल्यावर खरी गोष्ट लक्षात येते.
अशा घटना या पावसाळ्यात अनेक जणांबाबत घडल्या आहेत. वाहनचालक मात्र पेट्रोल पंपचालकांना दोष देतात. मात्र टाकीत पाणी होण्याचे मूळ आपल्या पेट्रोल टाकीच्या झाकणामध्ये आहे. हे लक्षात येत नाही. यामुळे टाकीत पाणी होऊ नये यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे. टाकीचे झाकण सैल लागत असल्यास ते दुरुस्त करणे किंवा बदलणे हा त्यावरील उत्तम उपाय. पावसाळ्यात पाण्यापासून बचावासाठी प्लॅस्टिकची झाकणेही मिळतात. त्याचा वापर करावा. जेणेकरून पाण्याचा एकही थेंब टाकीत जाणार नाही. एक थेंब जरी टाकीत गेला तर त्याचा इथेनॉलशी संपर्क  येतो व ‘थेंबे थेंबे’ का होईना पाणी वाढायला लागते.

टाकीत पाणी गेल्यास काय कराल?
टाकी पूर्ण रिकामी करावी. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावी. थोडा वेळ सुकू दिल्यानंतर मग पेट्रोल भरावे. तसेच टाकीचे झाकण नीट दुरुस्त करून घ्यावे व यापुढे टाकीत पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

इथेनॉलमिश्रित पेट्रोल?
इथेनॉलमिश्रित पेट्रोल म्हणजे भेसळ नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार २५ मार्च २०१५ पासून पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यात येत आहे. जगभरात अमेरिका, युरोपीय देशांसह २० पेक्षा जास्त देशांमध्ये  ई१० या प्रमाणात इथेनॉलमिश्रित पेट्रोल विकले जाते. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल स्वस्त असल्याने इंधन वाचण्याबरोबरच परदेशी चलनही वाचत आहे. ई१० म्हणजे १० टक्के इथेनॉल. असे ई१० ते ८५ पर्यंत इथेनॉल इंधनात मिसळण्यात येते. यामुळे एकटय़ा अमेरिकेमध्ये दरवर्षी ४.३ अब्ज डॉलर्स एवढे इंधन वाचत आहे. भारतातही याचा वापर सुरू झाल्याने त्याचा फायदा देशाचे परदेशी चलन १ ते २ टक्क्यांनी वाचणार आहे.