होंडा मोबिलिओ
car02मल्टिपर्पज व्हेइकल (एमपीव्ही) असूनही स्पोर्टी लूक, आतमध्ये बसायला मोकळी जागा, जास्तीचे सामान असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मायलेजही चांगला, लेग रूम, हेड रूमलाही अडचण नाही, प्रशस्त ग्राऊंड क्लिअरन्स, अन्य कोणती तक्रार नाही. फक्त सात जणांनी जमायचं, लांबच्या प्रवासाचा बेत आखायचा आणि निघायचं, तुमचा प्रवास सुखाचा होणारच.. कारण होंडाची मोबिलिओ!
वाहननिर्मिती क्षेत्रात इतरांची गाडी कण्हतकुथत चाललेली असतानाच होंडाने मोबिलिओ ही मल्टिपर्पज व्हेइकल (एमपीव्ह) प्रकारातली गाडी जुलमध्ये लाँच केली. मोबिलिओ एमपीव्ही असली तरी स्पोर्टी लूक आणि एकूणच तिचा रुबाब पाहता या गाडीला प्रतिसाद न मिळता तरच नवल होते. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असलेली मोबिलिओ म्हणजे एक सुखद अनुभव आहे. डिझेलवरील मोबिलिओ चालवण्याची संधी नुकतीच मिळाली. हायवे आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी चालवताना आलेला मोबिलिओचा अनुभव भन्नाट होता.

बाह्य़रूप
मोबिलिओच्या तोंडवळ्यापासून सुरुवात करू या. ज्यांनी अमेझ किंवा ब्रिओ पाहिली किंवा चालवली असेल त्यांना मोबिलिओच्या प्रथमदर्शनात या गाड्यांचाच भास होईल, आणि तो रास्तही आहे. कारण मोबिलिओचा तोंडवळा या दोन्ही गाडय़ांशी मिळताजुळता असाच आहे. गाडीचे बम्पर आणि हेडलाइट्स स्ट्राँग आहेत. शिवाय पुढील भागाला क्रोमचे कोंदण लाभले असून मध्ये होंडाचा दिमाखदार लोगो स्थानापन्न आहे. एलईडी हेडलॅम्प्स तसेच फॉगलॅम्प्सही उपलब्ध आहेत. हायवेला गाडीचा वेग कमी होऊ नये यासाठी एक सलग अशी किंचितशी खोलगट पट्टी देण्यात आली असून ती गाडीच्या मागच्या दारापर्यंत आहे. गाडीच्या िवडो स्लाइड्सही सलग अशा न ठेवता जरा वक्राकार ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागे किंवा मध्ये बसणाऱ्याला या काचा थोडय़ा उंच असल्यासारख्या भासतात. मागील दार उघडल्यानंतर आढळून येणारा बूट स्पेस कमालीचा मोठा आहे. किमान दोन-तीन बॅगा आरामात बसू शकतील एवढी जागा आहे. तुमच्याकडे जरा जास्तच सामान असेल तरी काही हरकत नाही. मागच्या दोन्ही सीट्स फोल्ड करून जागेचा कार्गो पद्धतीने वापर करू शकता. दोन्ही सीट्स फोल्ड करायच्या आणि तुमचे जास्तीचे सामान लोड करायचे. गाडीच्या मागच्या बाजूला व मागील सीटच्या उजव्या बाजूला टूल कीटसाठी एक स्वतंत्र खोबण देण्यात आली आहे.

मायलेजला उत्तम
हायवे आणि शहरातील रस्त्यांवरही मोबिलिओ चांगली चालली. स्मूद सस्पेन्शन हा एक सुखद अनुभव आहे. गाडी चालू आहे की नाही, असे वाटावे एवढे स्मूद सस्पेन्शन आहे. गीअर बदलवताना कुठेही अडचण जाणवत नाही की तांत्रिक दोष आढळत नाही. हायवेवर टॉप स्पीडला चालवली तरी गाडी कुठेही रस्ता सोडत नाही. खराब रस्त्यांवरही गाडी चांगली चालते. कारण ग्राऊंड क्लिअरन्स उत्तम आहे. फाइव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली मोबिलिओ पेट्रोल व्हर्जनला १७.३ तर डिझेल व्हर्जनला २४.५ किमी प्रतिलिटर मायलेज देते, असा होंडाचा दावा आहे. एकूणच एक कम्प्लीट फॅमिली कार म्हणून मोबिलिओकडे पाहायला हरकत नाही. सात आसनी प्रकारातली ही एमपीव्ही तुमचा प्रवास सुखाचा करेल, यात शंका नाही.

सीट्सची रचना
मोबिलिओची सीट रचना उत्तम आहे. पुढे दोन, मध्ये तीन आणि मागे दोन असे सात जण आरामात बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मात्र, मधल्या आसनांवर तीन जण आरामात बसू शकतील का, याची जरा शंका वाटते. कारण मोठय़ा आकाराची माणसे असतील तर दोघेच जण बसू शकतील असे वाटते. मधल्या सीटवर बसल्यावर तुम्हाला आर्म बेसही उपलब्ध आहे. शिवाय लेग रूमचीही व्यवस्था देण्यात आली आहे. सीट थोडे मागे-पुढे करून तुमच्या सोयीनुसार आणखी आरामदायी करू शकता येईल. मागच्या सीटवर मात्र थोडी अडचण होऊ शकते, विशेषत उंच लोकांना. कारण मागील सीट व गाडीची मागील दार यांच्यातील स्पेस असल्याने उंच माणसाचे डोके थोडे वर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबिलिओच्या मागच्या सीटवर मध्यम उंचीचे दोघेजण आरामात बसू शकतील. मागे बसण्यासाठी अर्थातच मधले दोन्ही सीट फोल्ड करून मगच आतमध्ये शिरता येईल.
ड्रायव्हरचे सीट अर्थातच इलेक्ट्रॉनिकली अ‍ॅडजस्टेबल आहे. ते थोडे बारीक वाटते. परंतु ओके आहे. ड्रायव्हरच्या बाजूला बसणाऱ्याला भरपूर लेग रूम उपलब्ध आहे, शिवाय त्याचे सीट मागेपर्यंत स्लाइड होऊ शकते. म्हणजे एखाद्याला डुलकी आली तर त्याने सरळ सीट मागे रेलून द्यावे आणि एक छानशी झोप काढावी एवढी लवचीकता आहे. अर्थात मधल्या सीटवर दोनपेक्षा जास्त माणसे नसतील तरच ते शक्य होईल. मधल्या व मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना एसीची हवा मिळावी यासाठी ड्रायव्हरच्या मागच्या सीटच्या वर व मधल्या सीटच्या समोर एसीची आडवी पट्टी देण्यात आली आहे. त्यातून हवा खेळती राहाते.

अंतर्गत रचना
मोबिलिओची अंतर्गत रचना साधी असली तरी चांगली आहे. टॉप एन्ड व्हर्जन गाडय़ांना रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे पाìकग करताना अडचण येत नाही. तर बेसिक प्रकारातील मोबिलिओमध्ये ही सुविधा नाही. तसेच डॅशबोर्डही फारसा क्लासिक नाही. मात्र, टॉप एन्ड मोबिलिओमध्ये त्याला वूडनचे वेष्टण देण्यात आले आहे. टॉप एन्ड व्हर्जनमध्ये १५ इंची ऑडिओ-व्हिडीओ नेव्हिगेशन टचस्क्रीन देण्यात आली आहे. तर बेसिक प्रकारात ही सुविधा नाही. बाकी एमपी थ्री, ऑक्स-इन, एफएम या सुविधा बेसिक प्रकारात आहे तर टॉप एन्डमध्ये डीव्हीडी, व्हीसीडी, ब्ल्यू टूथ, ऑक्स-इन, आय पॉड, एमपी थ्री या सुविधा आहेत. इलेक्ट्रॉनिकली कन्ट्रोल्ड मिर्स आहेत. ओडोमीटर, स्पीडोमीटर व्हीलच्या अगदी समोरच आहेत.

इंजिन
ब्रिओ आणि अमेझ या गाडय़ांना जे इंजिन देण्यात आले आहे तेच इंजिन मोबिलिओलाही बसवण्यात आले आहे. म्हणजे पेट्रोल व्हर्जनसाठी आय-व्हीटेक इंजिन आणि डिझेलसाठी आय-डिटेक इंजिन. डिझेल व्हर्जन गाडी चालवताना इंजिनाचा फारसा आवाज आला नाही. मात्र, हायवेवर तुम्ही जसजसा गाडीचा स्पीड वाढवता तसतसा इंजिनाचा आवाज वाढतो. मात्र, तो फारसा त्रासदायक वाटत नाही. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीला दीड लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.

व्हेरिएन्ट्स
ई, एस, व्ही, आरएस, आरएस (ओ) व नुकतीच बाजारात आलेली व्ही (ओ) या व्हेरिएन्ट्समध्ये मोबिलिओ उपलब्ध आहे. मारुतीच्या अर्टगिाला व शेवरोलेच्या एन्जॉयला ही गाडी टक्कर देऊ लागली आहे. गेल्या चार महिन्यांत मोबिलिओच्या मागणीत चांगली वाढ झाल्याची नोंद आहे.

सुरक्षा
सुरक्षिततेच्या दृष्टीने अँटी लॉक ब्रेकिंह सिस्टीम आहे. शिवाय एअर बॅग्जची सुविधा आहे. सेफ्टी बेल्ट आहे. सेफ्टी बेल्ट न लावल्यास तशी सूचना देणारी यंत्रणा, इममोबिलायझर यंत्रणा या सर्व सुविधा आहेत. दाराच्या आर्मरेस्टवर वस्तू ठेवता याव्यात अशा खोबणी देण्यात आल्या आहेत. हँडब्रेकच्या मागच्या बाजूलाही पाण्याची बाटली वगरे ठेवता येऊ शकेल अशी खोबण देण्यात आली आहे.

किंमत
७ लाखांपासून ते ११.४६ लाखांपर्यंत
(एक्स शोरूम किंमत)