आपल्या मोटारसायकल किंवा कारसाठी फक्त नवीन रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण उपलब्धतेनुसार हवा तो क्रमांक निवडू शकतो. त्यासाठी रुपये तीन हजारांपासून ते रुपये १२ लाखांपर्यंत फी भरण्याची गरज असते. चारचाकी कार या प्रकारच्या वाहनासाठी सगळ्यात जास्त फी भरावी लागते. कारव्यतिरिक्त इतर प्रकारच्या वाहनांसाठी जसे स्कूटर, मोटारसायकल, ऑटोरिक्षा, प्रवासी बस अशा प्रकारच्या वाहनांसाठी कारपेक्षा कमी शुल्क असते. तसेच चारचाकी कार या वर्गातील, परंतु व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असेल तर त्यासाठीसुद्धा कमी फी असते.
साधारणपणे मालिका सुरू होण्याच्या दिवशी एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांचे अर्ज प्राप्त होतात. अशा प्रसंगी त्या दिवसात प्राप्त झालेल्या अर्जातून लिलाव पद्धतीने अर्जदाराची निवड केली जाते. अर्जदारास विहित शुल्कापेक्षा अतिरिक्त रकमेची बोली लावण्याची फक्त एक संधी देण्यात येते. यामध्ये अर्जदाराने अतिरिक्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सीलबंद लिफाफ्यामध्ये जमा करायचा असतो. सर्व अर्जदारांचे लिफाफे एकाच वेळी उघडण्यात येतात आणि प्राप्त झालेले डिमांड ड्राफ्ट लिलावात भाग घेणाऱ्या सर्व अर्जदारांना दाखवण्यात येतात. ज्या अर्जदाराची बोली इतरांपेक्षा जास्त असेल त्याचा डिमांड ड्राफ्ट स्वीकारण्यात येतो व इतरांचे डिमांड ड्राफ्ट परत दिले जातात.
‘१’ या क्रमांकासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये व जर कार सिरीजमधला नंबर कारसाठीच घ्यायचा असेल तर रुपये चार लाख शुल्क आहे. पण कारसाठीच इतर मालिकांतील ‘१’ हा क्रमांक हवा असल्यास रुपये १२ लाख शुल्क आहे. ९, ९९, ९९९, ९९९९ तसेच ७८६ या क्रमांकासाठी कारच्या नियमित मालिकेत रुपये दीड लाख शुल्क आहे. इतर मालिकांतून हाच क्रमांक हवा असल्यास रुपये साडेचार लाख शुल्क आहे. काही प्रकारच्या क्रमांकासाठी रुपये ७० हजार, रुपये ५० हजार, रुपये १५ हजार असे नियमित मालिकेतील क्रमांकासाठी शुल्क आहे. या आकर्षक क्रमांकाची यादी एका शासन निर्णयाद्वारे ठरवण्यात आली आहे. सदर माहितीwww.mahatranscom.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
आकर्षक क्रमांकाव्यतिरिक्त इतर क्रमांक हवा असल्यास तो नियमित क्रमाने विनाशुल्क प्राप्त होतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीस आकर्षक नसलेला क्रमांक, परंतु नियमित क्रमांकानुसार न प्राप्त होणारा क्रमांक हवा असेल तर तसादेखील क्रमांक मिळू शकतो, मात्र त्यासाठी वेगळी फी भरावी लागते. सदर फीमध्येसुद्धा दोन प्रकार असतात.
चालू क्रमांकापासून १००० क्रमांकाच्या आतले क्रमांक आणि चालू क्रमांकापासून १००० क्रमांकाच्या पुढील क्रमांक यासाठी वेगवेगळे शुल्क असते.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे