दिव्यातील तरुणाचा प्रयत्न; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा आगळावेगळा प्रयत्न दिवावासीय असणाऱ्या सचिन गोताड यांनी केला आहे. त्यांनी पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती साकारली असून स्वत:च्या क लेला जपत पर्यावरणाचीही काळजी घेण्याचा सल्लाही गणेशमूर्तीच्या माध्यमातून समाजाला दिला आहे.

पुठ्ठय़ाची ही गणेशमूर्ती फक्त ६००-७०० रुपयांमध्ये बनवण्यात आली आहे. बाप्पाच्या या मूर्तीचे स्वरू प जास्वंदीच्या फुलामध्ये बसलेले आहे. पांढरा माऊंटबोर्ड पेपर आणि त्यावर विविध रंगाच्या टिन्टेड पेपरने केलेल्या नक्षीकामामुळे बाप्पाचे रूप अधिकच मोहक दिसते. मूर्ती दोन फुटाची असून सहा माऊंट बोर्ड पेपर आणि चार टिन्टेड पेपर लागले आहेत. टिन्डेड पेपरने केलेल्या नक्षीकामात दर्शना मोरे यांनी मदत केली असल्याचे त्याने सांगितले. साधारण ८००-९०० ग्रॅम वजनाची ही मूर्ती बनविताना गणपती बाप्पाच्या डोक्याकडे एक छोटी मोकळी जागा ठेवली आहे. मूर्तीची स्थापना करताना त्यात तांदूळ भरले असून त्या मोकळ्या जागेवर फूल ठेवले आहे. त्यामुळे हलक्या असणाऱ्या या मूर्तीची व्यवस्थित स्थापना झाली. तांदळाच्या वजनामुळे मूर्ती व्यवस्थित स्थानापन्न होऊ शकली आहे. पाण्यात विसर्जन केल्यानंतर माऊंट पेपर असल्याने ही मूर्ती सहज विरघळेल अशी आहे.