नियतीने फटकारलेल्या आणि आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या अनाथ गतिमंद मुली आता रंग आणि रेषांच्या जगात रमल्या आहेत. एकाकीपणाला आव्हान देण्यासाठी हाती घेतलेल्या कुंचल्यातून, गणपती बाप्पाच्या एक दोन नव्हे, तर तब्बल चारशे मूर्ती साकारल्या गेल्या आहेत.  अनाथ मुलींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या खरेदीतून नवा सामाजिक आधार आकार घेत आहे. तुळजाई प्रतिष्ठानच्या स्वआधार गतिमंद प्रकल्पातील शिक्षकांनी या मूर्ती मुलींकडून करुन घेतल्या.

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी शिवारात गतिमंद मुलींचा निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात सध्या ५७ अनाथ गतिमंद मुलींचे संगोपन केले जात आहे. विशेष म्हणजे यापकी अनेक मुलींचे नाव, पत्ता, आई-वडीलांची कसलीही माहिती उपलब्ध नाही. अशा मुलींना प्रकल्पात कायदेशीर प्रवेश मिळाल्यानंतर संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारीच त्यांचे नामकरण करतात. अशा मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम संस्थेतर्फे सुरू आहेत.  मुलींच्या शिक्षणाबरोबर आरोग्याचीही नीटनेटकी काळजी घेऊन त्यांना मानसिक स्थर्य प्राप्त करुन देण्यासाठी प्रकल्पाचे प्रमुख शहाजी चव्हाण यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

सध्या गणेशोत्सव जवळ आल्याने येथील मुलींचे हात पर्यावरणपूरक अशा श्री गणरायाच्या मूर्ती साकारण्यात मग्न झाले आहेत. या कामासाठी संस्थेतील कर्मचारी मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या मूर्तीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम स्वाधार प्रकल्पासाठीच खर्च करण्यात येते.