पावसाळा म्हटले की विषाणुसंसर्गाने होत असलेल्या आजारांचे प्रमाण वाढणार हे निश्चित. हवा आणि पाण्यावाटे पसरणारे हे आजार एव्हाना अनेकांच्या घरात प्रवेश करतेही झाले असतील. पण त्याचसोबत वर्षभर घरात असलेले आजारही पावसाळ्याच्या सोबतीने बळावतात. सर्दी, कफ, दमा तसेच अपचन, अ‍ॅसिडिटी आणि वात हे आजार त्यापैकीच. उन्हाळ्यात हे आजार बरे झाल्यासारखे वाटतात. रुग्णाला आराम पडतो, बरे झालो, असा विश्वास वाटतो. पण ही समजूत किती पोकळ आहे, याचा प्रत्यय पावसाळा सुरू झाल्यावर येतो. पावसाच्या कुंद वातावरणात हे आजार अधिक वाढतात.

बीज उन्हाळ्यातच..
पावसाळ्यात आजार डोके वर काढत असले तरी त्याची सुरुवात आधीच्या ऋतूत म्हणजे उन्हाळय़ातच होते. पावसाळ्यात कफ आणि वात हे दोन्ही प्रकार अधिक होतात. या दोन्हींची शरीरात साठवण ग्रीष्मापासून होते. त्यातच उन्हाची तलखी भागवण्यासाठी थंड पदार्थाचा आश्रय घेतल्याने त्याला खतपाणीच मिळते. पावसाळ्यातील दमट, थंड हवेची साथ मिळाल्यावर हे आजार अधिक जोमाने शरीराचा ताबा घेतात.

अपचन, उलटय़ा, जुलाब, अ‍ॅसिडिटी – पावसाळ्यात पचनक्रिया मंदावल्यामुळे हे आजार होतात. त्यातच पावसाळा आला की तळलेले पदार्थ, श्रावणातील उपवासाचे पदार्थ यांची रेलचेल वाढते. खरे तर हा पोट बिघडण्याचा काळ आहे. मात्र पचायला हलके पदार्थ खाण्याऐवजी थंड, आंबट, पचायला जड पदार्थ ताटात येतात आणि त्याची परिणती या आजारांत होते. वर्षभर असलेले हे आजार मग पुढची पायरी गाठतात.

आमवात – आम म्हणजे पचन न झालेले किंवा अपक्व आहाररस. वात हा सांधेदुखीशी निगडित असला तरी त्याचे मूळ पोटातील न पचलेल्या पदार्थाकडे आहे. आमवातात सांध्यांवर सूज येते, तेलाने मालिश केले तर दुखणे वाढते. दही, चिंच, लोणचे आहारातून काढावेत. सुंठीचा मुबलक वापर करावा. सुंठ, गूळ व तूप तसेच आले-लिंबाचा रस कफविकारांवर मात करतो. आले-लिंबाचा रस हा उत्तम पाचक आहे.

सर्दी, दमा – पावसात भिजलेले ओले कपडे दिवसभर अंगावर राहिले, पाय ओले राहिले की शरीरातील कफाच्या दुखण्याला बळ मिळते. उन्हाळ्यात खाल्लेले आइस्क्रीम, थंड पेय कफाच्या रूपात त्रास देतात. थंड आणि आंबट पदार्थ टाळावेत. वर्षांनुवर्षे सांगण्यात आलेली पाणी उकळून पिण्याची पद्धत वापरली तर कफविकारांपासून थोडीफार सुटका होऊ शकते. चहामध्ये पात टाकून घेतल्यास फायदा होतो. केळे, पेरू, संत्रे, द्राक्ष, अननस ही फळे टाळावीत. सफरचंद, पेर, डाळिंब, काळ्या मनुका, वेलची केळे ही फळे आहारात वापरता येतील.

श्रावणातले पदार्थ हानिकारक
भारतीय परंपरेने ऋतूमध्ये सांगितलेला आहार व दिनचर्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे लक्षात आले आहे. मात्र श्रावणातील पद्धत याला अपवाद आहे. चातुर्मासात उपवास सुरू होतात, या काळात मन सात्त्विक राहावे, तामसी भाव वाढू नये यासाठी कांदा, लसूण वज्र्य करायला सांगण्यात येते. मात्र लसूणही आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याशिवाय उपवासासाठी साबुदाणे, शेंगदाणे व बटाटे यांचा सढळ हस्ते वापर केला जातो. अनेकदा बेसनाची (चण्याचे पीठ) पुरणपोळी केली जाते. हे सर्व पदार्थ वातासाठी अत्यंत हानिकारक आहेत. हरभरे, वाटाणे, छोले हे सर्वच टाळायला हवेत. बेसनाच्या पिठल्यानेही त्रास होतो. तळलेले पदार्थ खाल्ल्याने कफ होतो. त्यामुळे हे पदार्थ टाळायला हवेत.
– वैद्य राजीव कानिटकर
विषाणू व जिवाणूंचा प्रताप
विषाणू व जिवाणूंच्या वाढीसाठी पावसाळ्यातील दमट वातावरण पोषक ठरते. त्यामुळे या काळात त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. काही जणांच्या शरीरात या विषाणूंच्या विरोधातील प्रतिकारकशक्ती कमी असते आणि त्यामुळे वर्षभर या ना त्या स्वरूपात त्यांना विषाणुसंसर्ग होत राहतो. योग्य व पूर्ण उपचार न घेतल्याने वर्षभरात केव्हा ना केव्हा हे आजार होतात आणि पावसाळ्यात संसर्गाची शक्यता कित्येक पटीने वाढल्यानंतर आजाराचे गांभीर्य अधिक वाढते.

अपचन, उलटय़ा, जुलाब, अ‍ॅसिडिटी – रस्त्यावरचे उघडे पदार्थ, बुरशी आलेले पदार्थ खाल्ल्यानंतर वर्षभरात केव्हाही पोटदुखीचा त्रास होतो. मात्र पावसात अमिबा तसेच रोटाव्हायरसचे प्रमाण वाढते. अन्नपदार्थ आणि हवेतून हा संसर्ग वारंवार शरीरात पोहोचतो आणि उलटय़ा, जुलाब, अ‍ॅसिडिटीने हैराण व्हायला होते. वर्षभर अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी खाण्याच्या वेळा, आहार आणि झोप याकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी उकळून पिणे, बाहेरचे, उघडय़ावरचे शिळे पदार्थ टाळायला हवेत. विषाणुसंसर्गाने होणारे आजार दोन दिवसांत बरे होतात. मात्र त्रास त्यापेक्षाही वाढला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सांधेदुखी – रोटाव्हायरसचाच एक प्रताप म्हणजे अंगदुखी. अंग मोडून आल्यासारखे वाटते. सांधे दुखतात. त्यातही ज्यांना आधी सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना या काळात अधिक वेदनांना सामोरे जावे लागते. थंड वातावरणामुळे रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. त्यातच पावसाळ्यात ज्येष्ठांचे फिरणे कमी झाल्याने शरीराच्या हालचाली कमी होतात व स्नायू आखडल्यासारखे वाटतात. आजाराची कारणे समजली की त्यावरील उपायही करता येतात. गरम पाण्याचा शेक, स्नायू मोकळे करण्यासाठी हलके व्यायाम प्रकार यांनी आराम पडू शकतो.

सर्दी, दमा – काही जणांना धूळ, परागकण यांच्या अ‍ॅलर्जीमुळे कफ होतो. पावसाळ्यातील दमट वातावरणात हा त्रास अधिक वाढू शकतो. वाऱ्यामुळे धुळीसारखे अ‍ॅलर्जी येणारे घटक शरीरात शिरकाव करण्याचे प्रमाणही वाढते. श्वसनयंत्रणेवर ताण पडल्याने, नलिकांना सूज आल्याने अस्वस्थता अधिक वाढते. पाऊस तसेच वाऱ्यापासून बचाव करणे हा प्राथमिक उपाय आहे. बाहेर जाताना तोंडावर मास्क लावावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधे नियमित घ्यावीत. ऋतू बदलणे आपल्या हातात नसते, मात्र शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणे आपल्या हातात आहे.