आपल्या हातातून अचानक निसटून जाणारी आणि एकदा निसटून गेली की पुन्हा सापडायला थोडा वेळ लागणारी गोष्ट असते, ती म्हणजे आपली स्वयंप्रतिमा (सेल्फ इमेज). आपण काय आहोत आणि आपण कसे आहोत, हे ओळखायला आपल्याला प्रयत्नपूर्वक शिकावे लागते. आपली स्वयंप्रतिमा नेहमी ‘आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्याविषयी काय वाटते?’ यावर अवलंबून असली तर फार तापदायक असते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी सौम्य प्रमाणात शारीरिक आणि मानसिक वैचित्र्य घेऊन जन्माला आलेला अतिशय संवेदनशील मुलगा होतो. माझ्यावर माझ्या आजूबाजूच्या माणसांच्या मताचा लगेच गडद परिणाम होत असे, त्या अर्थाने मी ‘संवेदनशील’ हा शब्द वापरला आहे. कलात्मकरीत्या संवेदनशील असा अर्थ इथे नाही. तो मी होतो आणि आहेच. पण तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. कमकुवत या अर्थाने मी संवेदनशील होतो, जो मी सावकाशपणे बदललो. आणि माझी स्वयंप्रतिमा मी स्वत:च्या संदर्भाने पाहायला शिकलो.

नैराश्य आणि एकटेपण यांच्या तावडीतून सुटण्याची आपण धडपड करत असताना, आपले मित्रमंडळी आणि समाजातील इतर माणसे यांना आपल्या परिस्थितीचे आकलन नसेल, तर ती माणसे कंटाळून अथवा रागावून आपल्याला दुय्यम वागवतात किंवा कालांतराने सरळ सोडून जातात. जवळच्या माणसांना अचानक सोडून गेलेले पाहताना माझ्या विशी आणि तिशीतील अनेक वर्षे गेली आहेत. फार सावकाशपणे आणि खूपच उशिरा, अनेक मार्गानी जेव्हा मी माझ्या मानसिक आरोग्याविषयी संपूर्णपणे सज्ञान झालो, तेव्हा मला माणसे दूर जाण्याची प्रक्रिया तटस्थपणे पाहता यायला लागली.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

अनेक वेळा इच्छा असूनही आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण निराश असताना मदत करता येत नाही. आपल्याला वेळोवेळी येणाऱ्या तरल किंवा अतिशय आक्रमक नैराश्याच्या लाटांमध्ये आपण असताना आपल्याला ओळखून योग्य ती मदत करणारी माणसे आपल्याला आपल्या आजूबाजूला तयार करावी लागतात. एखादी व्यक्ती आपली नातेवाईक आहे किंवा आपली जवळची मित्र आहे म्हणून ती आपल्याला मदत करू शकेल किंवा आपल्याला समजून घेईल, असे समजणे ही चुकीची गोष्ट आहे.

एकटेपणा हा नैराश्याचा परिणाम म्हणून येतो तसाच तो स्वतंत्रपणेही अस्तित्वात असतो. अगदी मानसिकदृष्टय़ा सबळ असलेल्या माणसालासुद्धा तो चाहूल न देता सावकाशपणे वेढतो. ज्या व्यक्तीसोबत आपण सतत असतो किंवा ज्या व्यक्तीची आपल्याला सवय आहे ती गेल्यानंतर येतो तो एकटेपणा, अशी आपली एकटेपणाची समजूत असेल, तर ती फार बाळबोध समजूत आहे.

आपल्याला कोणीही समजून घेऊ  शकत नाही, या जाणिवेचे मूर्त स्वरूप एकटेपणा हे असते. न समजून घेणाऱ्या असंवेदनशील माणसांच्या सहवासात आपण राहत असू तरी आपण संपूर्ण एकटे असतो. चुकीच्या राजकीय किंवा वेगळ्या सामाजिक जाणिवेच्या माणसांमध्ये राहताना तो येतो. आपल्याला सहन न होणारे आचारविचार असणाऱ्या मानवी समूहाच्या सान्निध्यात आल्याने तो येतो. त्यामुळे एकटेपणा ही काही भौतिक किंवा शारीरिक अनुभूती नाही. ती एक जाणीव आहे आणि बहुतेक वेळा सामान्य माणसे या जाणिवेला अतिशय घाबरून असतात. बाकी काहीही झाले तरी चालेल, पण माणसाला एकटेपणाच्या डोळ्यात डोळा घालून बघायचे नसते. कारण तसे करणे सोपे नसते. त्यामुळे आपले आयुष्य अनेकविध आवाजांनी आणि सहन होणार नाही अशा गर्दीने भरून टाकून माणसे घरात अगदी आपल्या नजरेसमोर उभ्या असलेल्या एकटेपणाला पाहणेसुद्धा टाळतात. आपली स्वत:ची आवड-निवड आणि दृष्टी तयार न करता चारचौघांना जे आवडेल तसे स्वत:ला घडवतात आणि वेगळे आणि एकटे होण्यापासून स्वत:चा बचाव करतात. योग्य वयात एकटेपणाशी नीट ओळख करून घेतली नाही, की आजूबाजूला कुणी नसताना एखाद्या जनावरासारखा तो एकटेपणा आपल्याला गाठतो आणि आपला फडशा पाडतो.

आपल्या शिक्षणात, आपल्या परंपरेत, आपल्या कौटुंबिक वातावरणात आणि अनेक मार्गानी आपल्या आजूबाजूची मोठय़ा माणसांची पिढी आपल्यावर करीत असलेल्या संस्कारांमध्ये माणसाने एकटे खंबीरपणे कसे उभे राहावे याची दृष्टी देणारे असे कोणतेही साधन, अनुभव आणि मार्ग आपल्याला मिळण्याची सोय नाही. भारत देशात अजूनही ग्रामीण आणि कृषी परंपरेवर आधारित असलेले सामूहिक जीवन जगण्याची सवय आणि दृष्टी आपल्याला कुटुंबात किंवा समाजात दिली जाते. नव्या यंत्रयुगात आणि नव्या महानगरी मानसिकतेत जगण्याचा अनुभव आपल्याला कुणीही शिकवत नाही. तो आपला आपल्याला फार कष्टाने कमवावा लागतो. आपण हए ळऌए ढएडढछए या आभासात लहानाचा मोठा झालेला समाज आहोत. आपले सणवार, आपली कार्यसंकृती, जबाबदारी घेण्याची वा ती पार पडण्याची रीत, आपली नाती जोडण्याची आणि तोडण्याची पद्धत हे सर्व काही ठोसपणे सामूहिक आहे. या दृष्टीने आपण अजूनही कृषीपरंपरेत जगणारी माणसे आहोत. आपले जगणे, आपले वाढणे यंत्रयुग पार करून आता वेगवान आणि विस्कळीत सांख्यिक संगणकयुगात आले असले तरी आपली सौख्य आणि आनंदाची, तसेच अनुभवाची व मानसिक स्थैर्याची कल्पना ही कृषीपरंपरेत होती तशीच आहे. तात्पर्य हे की,एकक म्हणून कोणत्याही व्यक्तीकडे बघायचा आपला दृष्टिकोन विकसित झालेला नाही.

समूहात राहणाऱ्या माणसांना किंवा फक्त तसेच राहण्याची सवय असलेल्या माणसांना एकल घटकाकडे बघायची संवेदनशील दृष्टी नसते. समूह खूश आणि आनंदात असेल तर त्यातला प्रत्येक जण खूश आणि आनंदात आहे, किंबहुना असायलाच पाहिजे हा नियम घेऊन बहुतांशी पौर्वात्य देशांतील समाज जगत असतात. ही जाणीव कोणतेही साधे वैचित्र्य घेऊन कुटुंबात किंवा समूहात जन्माला आलेल्या माणसांच्या मुळावर उठते.

मी माझ्या गोंधळाच्या आणि कोलाहलाच्या तरुण वयात कुटुंब, गोंगाट आणि सामाजिक धबडग्यातून अलगद बाजूला पडलो. कारण आपल्याला कुणी समजून घेणार नाही ही जाणीव माझ्यात फार वेगाने वाढीला लागली. ती माझे पालक सोडता इतर कुणालाही ओळखता आली नाही. माझ्या पालकांना ती समजून घेता आली म्हणून मी सुदैवी ठरलो. वेगळ्या जाणिवेच्या माणसाचा प्रतिकार हा अजूनच वेडेपणाचा मानला जातो. आपण एखाद्या समूहापासून लांब जातो आहोत, असे आपल्याला वाटायच्या आधी त्या समूहानेच आपल्याला फार पटकन बाहेर काढून टाकलेले असते. मी कागद आणि पेन जवळ करून लिहायला लागलो ते याच वयात. साधारण वीस-बावीस वर्षांचा असताना. माझ्या मनातील असलेले सर्व गोंधळ आणि दुखरेपण मी नेटाने आणि नेटकेपणाने उतरवून काढत गेलो. तेव्हा माझी ‘कोबाल्ट ब्लू’ ही कादंबरी लिहून पूर्ण झाली. मला माझ्या लिखाणाने फार चांगले स्थैर्य आणि एक माझी स्वत:ची म्हणून सम्यक दृष्टी दिली. अनेक वर्षे मी माझ्या परिसरावर, माझ्या समाजावर, माझ्या लहानपणावर रागावलेला मुलगा होतो. मला अनेक वाचक गेली दहा-पंधरा वर्षे हे विचारतात, की तुम्ही तुमच्या जन्मशहरावर इतके रागावलेले का असता? मी माझ्या लिखाणातून माझा राग व्यक्त होऊ दिला याचे मला आज फार बरे वाटते. कारण मी ते केले नसते तर माझी अस्वस्थता मांडण्याचा माझा एकमेव मार्ग मी बंद करून टाकला असता. माझे माझ्या जन्मशहरावर प्रेम आहे आणि त्यामुळे मला त्याच्यावर रागवायचा हक्क आहे, हे मी जाणून आहे.

मी माझ्या अस्वस्थ काळात वेडय़ासारखे प्रवास केले. कुठे तरी पोचून कसला तरी अर्थ सापडेल ही भूक त्यामागे असणार. त्या वेळी केलेल्या प्रवासाची एक आठवण म्हणजे, परतीची वेळ आली की माझ्या पोटात गोळा येत असे. कुठे परतायचे आहे ही नीट जाणीव मला होत नसे. आपण जिथून आलो तिथे आपल्यासाठी जागा नाही याची खात्री बाहेर प्रवासाला गेले की होत असे.

मला आज कुठे आणि कशासाठी परतायचे आहे याची माहिती आणि जाणीव आहे. हा गेल्या अनेक वर्षांत माझ्यामध्ये झालेला बदल आहे. तीच माझी कमाई आहे. मी आज माझ्या मनाला ओळखायला आणि हाताळायला संपूर्णपणे सक्षम आहे. आणि माझ्यातले तरुणपणीचे विष शांतपणे आणि हळूहळू ओसरून माझा काळेनिळेपणा कमी होत जातो आहे. मी सोडून गेलेल्या माणसांना माफ करायला शिकू लागलो आहे.

– सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com