परीक्षेच्या कामात सुलभता आणण्याच्या नावाखाली उत्तरपत्रिकांची ऑनलाइन तपासणी करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयोगाचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. ऑनलाइन तपासणीसाठी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना मुख्य उत्तरपत्रिका बाजूला राहून केवळ पुरवण्यांची पानेच स्कॅन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना नापास ठरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्या प्राध्यापकांना संगणकावर तपासण्याकरिता देण्यात आल्या होत्या, पण हजारो विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिका स्कॅनच झाल्या नसल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून मिळवलेल्या उत्तरपत्रिकांच्या फोटो कॉपीवरून स्पष्ट होत आहे. मुख्य उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंगच न झाल्याने या विद्यार्थ्यांच्या केवळ पुरवण्यांचीच तपासणी झाली. ४० पानांची मुख्य उत्तरपत्रिकाच तपासली न गेल्याने हे विद्यार्थी नापास झाले. अभियांत्रिकीच्या सर्व सत्राच्या मिळून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
‘इतर विषयांत ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास गुण असताना एकाच विषयात अवघे तीन गुण मिळाल्याने मी चक्रावून गेले. १५ पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करता येत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी विद्यापीठाकडे मागणी केली. माझ्या ‘ई-मेल’वर उत्तरपत्रिकांची स्कॅन कॉपी पाठविण्यात आली तेव्हा कुठे हा घोळ माझ्या लक्षात आला,’ असे ठाण्याच्या केसी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने सांगितले.
‘विद्यालंकार’च्या एका विद्यार्थ्यांलाही १०० पैकी अवघे सात गुण मिळाल्याने त्याने फोटो कॉपीसाठी अर्ज केला तेव्हा त्यालाही हाच अनुभव आला. साबू सिद्दिकी, वर्तक, रिझवी, डॉन बॉस्को, फ्रान्सिस आदी मुंबईतील असंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची हीच तक्रार आहे. या विद्यार्थ्यांनी फेसबुकवर आपला ग्रुपही तयार केला असून या प्रश्नावर कसा काय तोडगा काढायचा याची चर्चा करीत आहेत. या शिवाय परीक्षा विभागाने आपल्या मुख्य उत्तरपत्रिकेचा शोध घेऊन त्याचे मूल्यांकन करून नव्याने निकाल जाहीर करावा यासाठी विद्यापीठाच्या फेऱ्या मारत आहेत ते वेगळेच.
या विद्यार्थ्यांकडून तक्रार अर्ज भरून घेतले जात आहेत, मात्र मुख्य आणि फेरपरीक्षा (एटीकेटी) अवघ्या १५ दिवसांवर आल्याने हा घोळ परीक्षा विभाग निस्तरणार कधी, असा प्रश्न आहे. या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा वेळ मुख्य परीक्षेबरोबरच फेरपरीक्षेच्या अभ्यासावरही खर्च करावा लागणार आहे. सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांच्या तर पुढच्या करिअरवरच याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.