कुशल कामगार घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) तब्बल ८० टक्क्य़ांहून अधिक विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे. परीक्षा घेणारे मंडळ आणि प्रशिक्षण संस्थांमधील समन्वयाचा अभावाचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे.
आयटीआयच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष २०१२-१३मध्ये सहामाही पद्धत लागू करण्यात आली. याबाबत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रोजगार आणि प्रशिक्षण महासंचलनालयातर्फे (डीजीई अँड टी) संस्थांना कळविण्यात आले होते. यानुसार संस्थांमध्ये शैक्षणिक दर्जात अमूलाग्र बदल करण्यात आले. त्यानुसार सर्वकाही सुरळीत सुरू असताना नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अचानक ८० टक्के विद्यार्थी नापास झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत विद्यार्थ्यांनी संस्थांमधील प्राध्यापकांकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत काही माहीत नसल्याचे स्पष्ट केले. तर ‘डीजीई अँड टी’कडे चौकशी केली असता यंदा नकारात्मक गुणपद्धती लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत मात्र कोणत्याही सूचना विद्यार्थी तसेच संस्थेच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली नसल्याचे एका संस्थेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले. तसेच नकारात्मक गुणपद्धतीच्या अवलंबाबाबत प्रश्नपत्रिकेवर किंवा उत्तरपत्रिकेवर कोणताही उल्लेख नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे अचानक अशी पद्धती लागू करणे अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. आयटीआयमधील सध्याची गुणपद्धती ही अभियांत्रिकीच्या पातळीवरची असल्याची प्रतिक्रिया एका प्राध्यापकाने नोंदविली आहे. या प्रश्नी ‘डीजीई अँड टी’ने फेरविचार नाही केला तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. नकारात्मक गुणपद्धती लागू करण्यापूर्वी आयटीआयचे निकाल ७० ते ८० टक्के इतके लागायचे. यामुळे वर्षांला लाखो विद्यार्थी कुशल कामगार म्हणून बाहेर पडतात. सध्या विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण सुरू आहे. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे हे प्रशिक्षण थांबण्याची वेळ आली आहे तर अनेकांना काही कंपन्या सामावून घेणार होत्या तेही होणे आता कठीण असल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सध्या कुणीच वाली नसून राज्य सरकारने या प्रश्नी योग्य ती दखल घ्यावी अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.