कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगविलेल्या खासगी कनिष्ठ महाविद्यालयांकडे पुरेशी जागा, शिक्षक, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी पायाभूत व शैक्षणिक सुविधा नसतानाही त्यांना मान्यता कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित करत आता कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीच ‘टायअप’च्या विरोधात आघाडी उघडायचे ठरवले आहे.
टायअपमुळे सायन्स शाखेकरिता कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थाच मोडीत निघण्याची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे शिक्षकांच्या थेट पोटावरच पाय येणार आहे. ‘त्यामुळे, ज्या जेईई, नीटसारख्या केंद्रीय प्रवेश परीक्षांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परीक्षाच रद्द करून राज्याने आपल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयांकरिता स्वत:च सीईटी घ्यावी,’ अशी मागणी ‘महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघा’चे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी केली. टायअपमध्ये सहभागी असलेली विनाअनुदानित महाविद्यालये पात्रता निकषांची पूर्तता करीत नसताना त्यांना सरकार मान्यता तरी कशी देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नीट, जेईई या परीक्षांमुळे ‘टायअप’सारखे अनिष्ट प्रकार मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी भागातही फैलावले आहेत. काही विद्यार्थ्यांना टायअपचा अव्वाच्या सव्वा खर्च परवडत असला तरी कनिष्ठ मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांतील मुलांना हे आवाक्याबाहेरचे ठरत आहे. त्यातून जेईई, नीटचा अभ्यास इतका भरमसाठ आहे की तो कोचिंग क्लासेसशिवाय पेलून नेणेही कठीण आहे. अभ्यास आणि खर्च या दोन कारणांमुळे विज्ञान शाखा सोडून वाणिज्य किंवा इतर शाखांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.
या माहितीला साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्य कविता रेगे यांनीही दुजोरा दिला. मिठीबाई महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्मिता फाटक यांनी या संबंधात दिलेली माहिती धक्कादायक होती. ‘मिठीबाईमध्ये यंदा विज्ञान शाखेला प्रवेश घेतलेल्यांपैकी किमान १० ते १२ विद्यार्थ्यांनी विचार बदलून वाणिज्य शाखेला प्रवेश मिळेल का,’ अशी विचारणा केल्याची माहिती त्यांनी दिली.
‘दरवर्षी क्वचितच एकादा विद्यार्थी अशी विचारणा करतो. परंतु, प्रवेश घेतल्यानंतर पुढे प्रवेश परीक्षा आणि क्लासेसचे शुल्क याबाबत माहिती घेतल्यानंतर हे आपल्याला परवडणारे नाही, असे विद्यार्थ्यांच्या लक्षात
येते. त्यामुळे, हे विद्यार्थी शाखा बदलून मागत होते,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.              (समाप्त)

‘टायअप’ पथ्यावर
केवळ आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून चालविल्या जाणाऱ्या काही अनुदानित महाविद्यालयांच्या तर ही नवी व्यवस्था पथ्यावरच पडल्याचे दिसून येते. विद्यार्थी मिळत नसल्याने ही महाविद्यालये अनुदानित तुकडय़ा बंद करून सरकारकडे विनाअनुदानित तत्त्वावर बायफोकलच्या नव्या तुकडय़ांची मागणी करीत आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क घेता येईल. त्यासाठी वसईच्या एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य करण्याची क्लृप्ती रचली आहे. तर वांद्रय़ातील एका महाविद्यालयाने गणित विषय अनिवार्य करून टाकला आहे.