राज्याच्या शालेय अभ्यासक्रमांतून आता कायद्यांचीही ओळख करून देण्यात येणार आहे. शालेय अभ्यासक्रमात कायदेविषयक अभ्यासाचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाच्या विचाराधीन असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी यासंदर्भात तावडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असता, जगताप यांना दिलेल्या लेखी उत्तरात तावडे यांनी हे आश्वासन दिले आहे.
कायद्याचे ज्ञान सर्वाना असणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक अडचणी उद्भवतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून याबाबतची माहिती असली पाहिजे. देशाच्या भावी पिढीला कायद्याचे प्राथमिक ज्ञान मिळावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात कायदेविषयक अभ्यासाचा समावेश करावा, अशा आशयाचे निवेदन आमदार जगताप यांनी तावडे यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याला तावडे यांनी लेखी उत्तर दिले आहे. शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करत असताना  कायदेविषयक प्राथमिक माहितीचा समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे त्यांनी उत्तरात म्हटले आहे.
यापूर्वी माहिती अधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, पर्यावरण कायद्यातील काही भाग, वाहतूक विषयक कायद्यांचा काही भाग यांचा समावेश करण्याचे प्रस्तावही विविध संस्थांकडून शासनाकडे देण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली