आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून मुंबई विद्यापीठाला पसंती मिळू लागली असून या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या कालिना येथील संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वसतीगृह बांधण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
स्वयंअर्थसाह्य अभ्यासक्रमांना या विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दर्शविली असून बीएमएस, बीएससी आयटी, बीएससी कॉम्पयुटर सायन्स आदी या अभ्यासक्रमांना प्राधान्य मिळत आहे. शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये नायजेरिया, सौदी अरब, अफगाणिस्तान, इराण, ईजिप्त, ऑस्ट्रेलिया, युके, कोरिया, मॉरिशस आणि चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था चर्चगेट येथील वसतीगृहात करण्यात येते. या वसतीगृहात १३० विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकते. २०१३-१४ मध्ये २२७ परदेशी विद्यार्थी मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी दाखल झाले. त्यामुळे चर्चगेट येथील वसतीगृह कमी पडू लागले. म्हणून कालिना संकुलात या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला. या वसतीगृहासाठी १४.६७ कोटी रुपये खर्च येणार असून एका खोलीत एका विद्यार्थ्यांची सोय असलेल्या २४  तर अधिक विद्यार्थ्यांसाठी एक खोली अशा ६१ खोल्यांचा समावेश या वसतीगृहात असेल.