डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शंभर उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणात चौकशी समितीने त्यांचा अहवाल सादर केला, पण हा अहवाल वादग्रस्त व्यक्तीने तयार केल्याने तो संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सर्व प्रकरणात नवनियुक्त कुलगुरूंना अडचणीत आणण्याचा जोरदार प्रयत्न विद्यापीठात होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रथमदर्शनी चौकशी अहवालानंतर आता विभागीय चौकशीची घोषणा लवकरच होईल व त्यानंतर संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे. या प्रकरणाचा सर्वप्रथम खुलासा ‘लोकसत्ता’ने शनिवार, ५ जानेवारी रोजी केला होता, हे विशेष.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत दोन विनाअनुदानित महाविद्यालयांतील कीटकशास्त्र विभागाच्या परीक्षार्थीच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. या प्रकरणात विद्यापीठाने चौकशी समितीची घोषणा केली. या प्रकरणातील चौकशी अधिकारी वादग्रस्त असल्याचे ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर चौकशी समितीच्या अहवालाबाबत विद्यापीठात प्रश्न उपस्थित केले गेले. निर्धारित तारखेच्या आत अहवाल सादर न करता तब्बल पाच दिवस उशिराने हा अहवाल सादर केला गेला. त्यात अकोल्यातील परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचा प्रत्यय अहवाल येण्यापूर्वीच परीक्षा विभागातील जल्लोषावरून दिसत होता. या अहवालात नागपूर येथील तपासणी केंद्राचे प्रमुख व इतरांवर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली.
चौकशी समितीने जबाबदारी निश्चित करताना चेहरा पाहून ती केल्याचा संशय बळावतो. या प्रकरणात उत्तरपत्रिका देवाण-घेवाण होणाऱ्या स्लिपवर खाडाखोड का करण्यात आली, या प्रश्नास बगल देण्यात आल्याची माहिती मिळाली. तसेच या प्रकरणाचा संबंध नसताना चौकशी अधिकाऱ्याने आष्टा या प्राध्यापकांच्या संघटनेच्या निवडणुकीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. चौकशी अधिकाऱ्याने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यास या संदर्भात विचारणा केल्याने अंतर्गत हेव्यादाव्यांसाठी हे प्रकरण वापरले जात असल्याचे चित्र आहे.
परीक्षा विभागातील एका माजी अधिकाऱ्याने अकोल्यातील त्याच्या मित्राला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची माहिती आहे. या अहवालात अकोला येथील परीक्षा विभागातील त्रुटींकडे डोळेझाक करत नागपूर येथील तपासणी केंद्रावर दोषारोप ठेवल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली. याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात अधिष्ठाता (कृषी) डॉ. व्ही.एम. भाले यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणानंतर जनसंपर्क अधिकारी व इतर अधिकारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीस योग्य ती माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याची योग्य ती दखल राज्य सरकारने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

उपस्थित होणारे प्रश्न
* वादग्रस्त व्यक्तीकडे या प्रकरणाची चौकशी का देण्यात आली?
* चौकशी समितीने पाच दिवस उशिराने अहवाल का सादर केला?
* चौकशी समितीने सादर केलेला अहवाल विद्यापीठ स्वीकारणार का?
* परीक्षा विभागात पूर्वी काम केलेल्या व्यक्तींनी चौकशी का केली?
* उत्तरपत्रिका देवाण-घेवाण स्लिपवर खाडाखोड का करण्यात आली?
* पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांवर संशय असताना क्लीन चीट का?
* अद्याप विद्यापीठाने या प्रकरणात पोलिसात तक्रार का केलेली नाही?
*  शंभर विद्यार्थ्यांमुळे इतरांचे निकाल थांबविण्यात येणार का?
* शंभर विद्यार्थ्यांची या प्रकरणामुळे पुनर्परीक्षा कधी घेण्यात येणार?