अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयाला पुण्यातील जागरूक विद्यार्थ्यांचा धडा

थोडीशी जागरूकता ठेवून आपल्याकडून घेण्यात आलेल्या शुल्काबद्दल विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माहिती गोळा केली आणि

प्रतिनिधी, पुणे | February 9, 2013 12:30 PM

थोडीशी जागरूकता ठेवून आपल्याकडून घेण्यात आलेल्या शुल्काबद्दल विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माहिती गोळा केली आणि महाविद्यालयाने आकारलेले जास्तीचे शुल्क वसूलही केले, तेही कोणतीही आंदोलने, विद्यार्थी संघटना व राजकीय संघटना या सर्वाना दूर ठेवून..!
ही गोष्ट आहे पुण्यातील वाडिया महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थेतील. तिथे या व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क नियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेतले जात होते. एका विद्यार्थ्यांने शिक्षणासाठी एका संस्थेकडून अर्थसहाय्य घेतले होते. त्यावेळी महाविद्यालय शुल्क कसे आकारते, कोणत्या निकषांवर शुल्क आकारले जाते याची माहिती घेण्यासाठी या विद्यार्थ्यांने आणि त्याच्या मित्रांनी शिक्षण शुल्क समितीकडे अर्ज केले. शिक्षण शुल्क नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांकडून १७ हजार रुपये जास्त घेतल्याचे उघड झाले. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क नियंत्रण समितीच्या आदेशानुसार महाविद्यालयाला जास्त घेतलेले पैसे परत करावे लागले. त्यावेळी आपली फसवणूक होत असल्याची जाणीव इतरही विद्यार्थ्यांना झाली.
विद्यार्थ्यांकडून एका वर्षांसाठी ८९ हजार रुपये शुल्क घेतले जात होते. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्याकडून दोन धनादेश घेण्यात आले होते. महाविद्यालयामध्ये उपलब्ध नसणाऱ्या सुविधांसाठीही महाविद्यालयाने शुल्क आकारून त्यासाठी विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र धनादेश घेतला होता. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि सर्व विद्यार्थी एकत्र आले. महाविद्यालयाने आपल्याकडून जास्तीचे उकळलेले शुल्क वसूल करायचे असे विद्यार्थ्यांनी ठरवले. मात्र, शिकत असताना महाविद्यालयाशी वाद घातला, तर महाविद्यालयाकडून शैक्षणिक नुकसान केले जाण्याची भीती वाटत होती. मग, महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाकडे घेतलेल्या शुल्काचे स्पष्टीकरण मागायचे असे विद्यार्थ्यांनी ठरवले. त्याप्रमाणे सगळ्या वर्गाने एकत्र येऊन आंदोलने, संघटनांचा दबाव असे काहीही न करता महाविद्यालय व्यवस्थापनाशी लढाई सुरू केली. शिक्षण झाल्यानंतर काही विद्यार्थी नोकरी करत होते, काही पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले होते. मात्र, तरीही ही मोहीम थंडावली नाही.
सगळे नियम, कायदे, महाविद्यालयाचे नियम या सर्वाचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला जेरीस आणले. त्याचवेळी महाविद्यालयालाही कोणतेही कारण राहू नये, यासाठी महाविद्यालय जी कागदपत्रे मागेल, ती हजर करायची, ज्या अटी घालेल त्या पूर्ण करायच्या, ज्या अटी अव्यवहार्य असतील त्याला चोख उत्तर द्यायचे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी चार महिने लढा दिला. महाविद्यालयाचे कर्मचारी, अधिकारी जागेवर नसणे, कर्मचाऱ्यांकडून मिळणारी उद्धट उत्तरे अशा सगळ्याला विद्यार्थ्यांनी तोंड दिले.
अखेर महाविद्यालयाकडील कारणांची यादी संपली आणि महाविद्यालयाने तीस विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करावे लागले. या महाविद्यालयाने ३ जानेवारीला प्रत्येक विद्यार्थ्यांला १७ हजार रुपये शुल्क परत केले.

जादा शुल्क परत
वाडिया महाविद्यालयाने जादा घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांच्या जागरुकतेमुळे परत केले. मात्र, अनेक महाविद्यालयांकडून ते परत केले जात नाही. त्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे.

First Published on February 9, 2013 12:30 pm

Web Title: lesson by awared students in pune to extra fees takers collage