सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम आखून राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठीची तयारी मजबूत केली असली तरी परीक्षांचे वेळापत्रक आखताना मात्र स्वत:चेच खरे केले आहे. उलट सीबीएसईने मात्र, महत्त्वाच्या विषयाच्या परीक्षांत पाच ते सहा दिवसांचे अंतर ठेवले आहे.
सीबीएसईने आपल्या अभ्यासक्रमाचा विस्तृत आवाका ओळखून परीक्षेच्या वेळापत्रकाची आखणी करताना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या मुख्य विषयांसाठी पाच ते सहा दिवसांची सुट्टी मिळेल याची काळजी घेतली आहे.  
जेईई आणि नीटमुळे येऊ घातलेल्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अपरिहार्यपणे परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, विज्ञानाच्या मुख्य विषयांच्या परीक्षांमध्ये सीबीएसईच्या धर्तीवर पाच ते सहा दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या रसायनशास्त्राची परीक्षा १० मार्चला आणि १ मार्चला होणारी गणिताची परीक्षा १७ मार्चला (दोन्ही दिवस रविवार) घेऊन परीक्षांमधील अंतर वाढविता येणे मंडळाला शक्य आहे. परीक्षांमधील अंतर वाढविल्यास त्याचा विद्यार्थ्यांना सरावासाठी उपयोग होईल, या बद्दल शिक्षकांचेही एकमत आहे. काही पालकांनी शिक्षण मंत्री आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आहे. यावर मंडळ काय प्रतिसाद देते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.   (क्रमश:)    

या क्षणाला बदल शक्य नाही !
बारावीचे वेळापत्रक वर्षांच्या सुरुवातीलाच जाहीर केले होते. या वेळापत्रकावर आक्षेप होते तर ते संबंधितांनी आधीच घ्यायला हवे होते. त्यातून सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळांची तुलना करता येणार नाही. दरवर्षी बारावीचे सुमारे १४ ते १५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात. विद्यार्थ्यांची संख्या, विषयांची उपलब्धता, परीक्षेचे माध्यम यातील वैविध्य पाहता मंडळावर सीबीएसईच्या तुलनेत परीक्षेच्या कामाचा प्रचंड बोजा असतो. त्यातून निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, असा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. त्या दृष्टीने प्रश्नपत्रिका छापून तयार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात आयत्या वेळेस बदल करता येणे शक्य नाही. सुट्टीच्या दिवशी यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने १० आणि १७ मार्चलाही (रविवारी) परीक्षा घेता येणार नाही. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच दुरूस्ती सुचविली असती तर त्याचा निश्चितपणे विचार केला असता. पण, पुढील वर्षी वेळापत्रक सुखकर करता येईल याचा विचार करू.
– सर्जेराव जाधव,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.