जागतिक आर्थिक विकासदरामध्ये भारत अग्रस्थानी आहे. त्यामुळे परदेशातील थेट गुंतवणूक याठिकाणी वाढत आहे. त्याचबरोबर विविध करांमध्ये वाढ करून बँकेच्या व्याज दरात कपात केली आहे. याचे परिणाम पुढील काळात दिसून येतील. यासाठी तुमची साथ पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी येथे केले. महालक्ष्मी को-ऑप. बँक व ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृतिदिननिमित्त तेंडुलकर व्याख्यानमालेची दीपप्रज्लवन करून सुरुवात झाली.
’अच्छे दिन काही दृश्य, काही अदृश्य’ या विषयावर सहस्त्रबुद्धे म्हणाले,  ‘‘कामगार व उद्योगाविषयी सकारात्मक निर्णय होत आहेत. महिलांच्या वाढत्या अत्याचाराबद्दल ‘सखी’ नावाने योजना सुरू करणार असून, केंद्रशासित प्रदेशात   महिलांना पोलीस भरतीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शेतकऱ्याना शेतीपूरक व्यवसाय देण्याचा सरकारचा विचार आहे.जनतेच्या हिताच्या योजना आणल्या आहेत. शिक्षणाचा अधिकार आहे, पण यातील काही नियम व अटी त्रासदायक आहेत. ऊसतोड व वीटभट्टी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे.’’