विद्यापीठात नोकरीस लावण्याच्या आमिषाने अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबतची फिर्याद आत्माराम दादू मोटे (वय ४७, रा. कुशीरे पोहाळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी दिली. नितीन वसंत कदम (रा. आसुल्रे पोल्रे, ता. पन्हाळा), रोहित यादव (गुजरी), बजरंग िहदुराव घाटगे (रा. पोल्रे ता. पन्हाळा), जयदीप आनंदराव निकम (रा. निकमवाडी ता. पन्हाळा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्माराम मोटे यांच्या नातेवाइकांवर काही महिन्यांपूर्वी येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. यासाठी मोटे वारंवार सीपीआर रुग्णालयात येत असत. याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या रोहित यादव याच्याशी मोटे यांची ओळख झाली.

या ओळखीतूनच रोहितने आपल्या मित्राचे मेव्हणे मंत्रालयात सचिव आहेत. त्यांच्या ओळखीने तुमचा मुलगा सूरजला शिवाजी विद्यापीठ लिपिक पदावर नोकरीस लावतो असे सांगितले. यानंतर रोहितने नितीन कदम याची दिगंबर वसंत साळुंखे या बनावट नावाने आत्माराम मोटे यांच्याशी ओळख करून दिली.

नितीनने नोकरी लावण्यासाठी सुमारे ३ लाख रुपयांची मागणी मोटेंकडे केली. मोटेंनी ही रक्कम दिल्यानंतर काही दिवसांनी रोहित, नितीन, बजरंग, जयदीप यांनी सूरज मोटे याच्या नावे अर्थशास्त्र विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र तयार केले. हे नियुक्तीपत्र सूरज मोटेस दिले.

नियुक्तीपत्र घेऊन सुरज शिवाजी विद्यापीठात रुजु होण्यास गेल्यानंतर अशा प्रकारचे कोणतेही पत्र कार्यालयाने दिले नसल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची फिर्याद आत्माराम मोटे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

फसवणुकीची व्याप्ती वाढणार

नितीन कदम, रोहित यादव, बजरंग घाटगे, जयदीप निकम या संशयितांनी अनेक जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात अकरा जणांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी केले. या चौघांनी शिवाजी विद्यापीठाचे सहसचिव यांचे बनावट सही, शिक्के वापरून नियुक्तीपत्र तयार केले. नियुक्तीपत्रावर जावक क्रमांकही टाकण्यात आला होता. यामुळे या बनावट नियुक्ती पत्राच्या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.