भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याने टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा संयुक्त आघाडी मिळविली. त्याने सातव्या फेरीत नेदरलँड्सच्या लोएक व्हॅनव्हेली याच्यावर सहज विजय मिळविला. सातव्या फेरीअखेर आनंद व मॅग्नुस कार्लसन यांनी प्रत्येकी पाच गुणांसह आघाडी मिळविली आहे. आनंदने केवळ ३७ चालींमध्ये व्हॅनव्हेलीवर मात केली. कार्लसन याने हंगेरीच्या पीटर लेको याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवला. अमेरिकेचा हिकारु नाकामुरा व रशियाचा सर्जी कर्झाकिन यांनी प्रत्येकी साडेचार गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. भारताचा पी.हरिकृष्ण हा लिवॉन आरोनियन (अर्मेनिया) याच्या साथीत पाचव्या स्थानावर आहे. त्यांचे प्रत्येकी चार गुण आहेत.