ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सन वॅन हू वर श्रीकांतने १५-२१, २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला. सन वॅन हू ला पराभूत करण्याची श्रीकांतची ही दुसरी वेळ आहे. गेल्याच आठवड्यात इंडोनेशियन ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने वॅन हू चा पराभव केला होता.

श्रीकांतला आपला सामना जिंकण्यासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र श्रीकांतने वॅन हू कडून आघाडी खेचून घेत १६-१० अशी आघाडी घेतली, आणि दुसरा सेटही आपल्या खात्यात टाकला. निर्णायक सेटमध्येही श्रीकांतने वॅन हूला धक्का देत सुरुवातीपासून आघाडी आपल्याकडे कायम ठेवली. तिसऱ्या सेटमध्ये श्रीकांतच्या फटक्यांना उत्तर देणं वॅन हू ला जवळपास अशक्यप्राय दिसत होतं. एका क्षणापर्यंत श्रीकांतकडे ९ गुणांची आघाडी होती.
या विजयामुळे श्रीकांने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे.

गेल्या काही स्पर्धांमधला श्रीकांतचा फॉर्म हा नक्कीच धक्क करणारा आहे. ५ स्पर्धांपैकी श्रीकांतने ३ स्पर्धांची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दुसऱ्या सामन्यात साई प्रणीतनेही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर येणार आहेत. साई प्रणीतने आज चीनी प्रतिस्पर्ध्यावर २१-१५, १८-२१, २१-१३ अशा सेट्समध्ये मात केली.

सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, तर दुहेरीमध्ये अश्विनी पुनप्पा, सिकी रेड्डी तर पुरुषांच्या दुहेरीमध्ये सत्विकसाईराज रेड्डी, चिराग शेट्टी यांचं आव्हान शिल्लक आहे.