भारताच्या किदम्बी श्रीकांतची स्वप्नवत वाटचाल सुरुच असून  इंडोनेशियन ओपनपाठोपाठ श्रीकांतने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही बाजी मारली. अंतिम सामन्यात श्रीकांतने चेन लाँगवर २२-२०, २१-१६ ने मात करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये श्रीकांतची लढत ऑलिम्पिक विजेता आणि दोन विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या चेन लाँगशी होती. अपेक्षेप्रमाणे ही लढतही चुरशीची झाली. पहिल्या सेटमध्ये श्रीकांत ११-९ ने आघाडीवर होता. पण त्यानंतर लाँगने पुनरागमन करत सलग तीन गूण मिळवत १२-११ अशी आघाडी घेतली. पण २४ वर्षीय श्रीकांतने शांतचित्ताने त्याचा खेळ सुरुच ठेवला आणि पहिला सेट २२-२० ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही श्रीकांतने पहिल्या पासूनच आघाडी मिळवली होती. चेन लाँगने त्याच्यावर पलटवार केला. पण श्रीकांत विजयाच्या निर्धारानेच कोर्टवर उतरला होता. दुसरा सेट त्याने २१-१६ ने जिंकला आणि सात दिवसांत दुसऱ्यांदा सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावले.

श्रीकांतने पहिल्यांदाच चेन लाँगवर मात केली आहे. सहा सामन्यानंतर श्रीकांतला हे यश मिळाले आहे. किदम्बी श्रीकांत सध्या फॉर्मात असून सलग तिसऱ्या सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा श्रीकांत पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी इंडोनेशियाचा सोनी द्वि कुंकोरो, मलेशियाचा ली चाँग वेई, चीनचे चेन लाँग आणि लीन डॅन यांनी हा विक्रम केला होता. श्रीकांतने  इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजय मिळवला. श्रीकांतचे हे कारकिर्दीतील चौथे विजेतेपद आहे.