महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या मिताली राजच्या भारतीय महिला संघासाठी बीसीसीआयने खास कौतुक सोहळा आयोजित करणार असल्याचं समजतंय. बुधवार नंतर भारतीय महिला संघ भारतात परत येईल, यावेळी भारतीय खेळाडूंची वेळ घेऊन बीसीसीआय हा जंगी कार्यक्रम आखणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेली आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण आतापर्यंत ठरवण्यात आलेली नाहीये.

बीसीसीआयने भारतीय संघातल्या महिला खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख तर सपोर्ट स्टाफला २५ लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. या प्रस्तावित सोहळ्यात सर्व भारतीय संघाला त्यांच्या इनामाचे धनादेश दिले जाणार आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याचं एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हणलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सामना संपायच्या आधी आणि नंतर मिताली राजच्या टीम इंडियाने केलेल्या खेळाचं कौतुक केलं होतं.

महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी भारतीय महिलांचंही आयपीएल सुरु करावं अशी मागणी केली होती. मात्र असला कोणताही प्रस्ताव बीसीसीआयसमोर नसल्याचं सांगत, पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे आता भारतीय संघाचं लक्ष असल्याचं बीसीसीआयने म्हणलं आहे.

उपांत्य फेरीत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाणी पाजणाऱ्या भारतीय महिला अंतिम सामन्यात इंग्लंडच्या दबावासमोर लगेच कोसळल्या. त्यामुळे एक वेळ सामन्यावर पकड मजबूत केलेला भारतीय महिलांचं संघ, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे अंतिम फेरीत ९ धावांनी पराभूत झाला. मात्र अंतिम फेरीपर्यंत पोहचून भारतीय महिलांनी केलेल्या खेळाचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसतंय.