क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून प्रेरणा घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खेळाडूंसाठी ‘कामगिरी दाखवा, पैसे कमवा’ ही योजना राबवण्याच्या विचारात आहे. मायदेशातील आणि परदेशातील मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यावर आधारित भत्ते दिण्याचा हा प्रस्ताव आहे.
बीसीसीआयच्या वित्त समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये याबाबतच्या आराखडय़ावर चर्चा झाली. यावेळी समितीमधील सदस्यांनी प्रस्तावासाठी अनुकूलता दर्शवली. आयपीएलचे प्रशासकीय प्रमुख सुंदर रामन यांनी याबाबत वित्त समितीपुढे सादरीकरण केले.
दरम्यान, वित्त समितीने भारतीय महिला खेळाडूंसाठीसुद्धा श्रेणीनिहाय वार्षिक मानधनाची योजना आखली आहे. ‘अ’ श्रेणीत मिथाली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असेल, त्यांना १० लाख रुपये मानधन देण्यात येईल. तर ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना पाच लाख रुपये मानधन असेल.