रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीमध्ये युव्हेंट्स क्लबचा अडथळा पार करण्याचे आव्हान

झिनेदिन झिदान व रिअल माद्रिद फुटबॉल क्लब हे एकाच वेळी विक्रमाच्या उंबरठय़ावर उभे आहेत आणि त्यांच्या मार्गात युव्हेंट्स क्लबचा अडथळा असणार आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या लढतीत रिअल माद्रिद आणि युव्हेंट्स शनिवारी मध्यरात्री एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. माद्रिदसाठी ही केवळ जेतेपदाची लढत नसून युरोपातील आपली मक्तेदारी दाखवून देण्याची संधी आहे.

युरोपियन चषक स्पध्रेचे १९९२ साली स्वरूप बदलून त्याला चॅम्पियन्स लीग असे नाव देण्यात आले आणि त्या सालापासून ते आत्तापर्यंत कोणत्याही क्लबला जेतेपद कायम राखता आलेले नाही. गतविजेत्या माद्रिदला हे आव्हान यशस्वीपणे पेलावे लागणार आहे, तर वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात झिदान यांनाही विक्रम खुणावत आहे. चॅम्पियन्स लीगच्या इतिहासात दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या प्रशिक्षकांमध्ये नाव नोंदवण्याची संधी झिदान यांना आहे. माद्रिदने चार मोसमात तीन वेळा चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

माद्रिदने २००२, २०१४, २०१६ आणि २०१७ च्या चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्या सर्व लढतीत झिदान यांचा सहभाग होता. माद्रिदने २००२साली झिनेदिन झिदान यांच्या निर्णायक गोलच्या जोरावर बायर लेव्हर्कुसेनचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर २०१४ साली प्रशिक्षक कार्लो अँसेलोट्टीच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने १२ वर्षांचा युरोपियन जेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्या वेळी झिदान हे अँसेलोट्टी यांच्या साहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. २०१६मध्ये झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने चषक उंचावला आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी माद्रिदला मिळाली आहे.

एक प्रशिक्षक म्हणून मी योग्य वाटचाल करत आहे, परंतु संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे.

झिनेदिन झिदान