‘मनमाड कबड्डी प्रिमियर लीग’ची धूम

‘कबड्डीची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या मनमाड शहरात सध्या ‘प्रो कबड्डी’ स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित ‘मनमाड कबड्डी प्रिमियर लीग’ स्पर्धेची धूम सुरू आहे. कबड्डीमध्ये संपूर्ण राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून स्पर्धेला कबड्डीप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांनी गर्दी केलेल्या उद्घाटनाच्या सामन्यात स्टार फायटर्सने ब्लू पँथर संघाचा ५२-३३ असा पराभव केला. पहिल्या दिवसाच्या इतर सामन्यांमध्ये गोल्डन बॉईजने ब्लॅक टायगर्सवर ४७-४२ तर रूद्रा रायडर्सने बिग फायटर्सवर ३८-२९ अशी मात केली. या दिवसातील उत्कृष्ठ चढाईसाठी अक्षर हिरे, विजय बेदाडे, उत्कृष्ठ पकडीसाठी सुनील औरंगे, संनी सांगळे तर सामनावीर म्हणून रहेमान शेख, विजय बेदाडे यांना गौरविण्यात आले.

प्रो कबड्डीच्या मैदानावर जे जे काही, ते सर्व उपलब्ध करण्याचा प्रयत्न येथे आयोजक नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. प्रकाशझोत.. मॅट.. सुमारे चार हजाराची क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी..नवीन नियमांनुसार सामने..खेळाडुंच्या वैयक्तिक कामगिरीची संगणकाद्वारे विशेष नोंद, यांसह भरघोस बक्षिसांचा दणका. असे सर्व काही येथे आहे. स्पर्धेसाठी स्थानिक खेळाडुंचा समावेश असलेले सहा संघ तयार करण्यात आले असून एकूण ७२ खेळाडू ब्लू पँथर, स्टार फायटर्स, बिग फायटर्स, गोल्डन बॉईज, रुद्रा रायडर्स, ब्लॅक टायगर्स, या संघांमध्ये विभागले गेले आहेत. या संघांची मालकी अनुक्रमे राजाभाऊ अहिरे, रफिक खान, राजाभाऊ पगारे, दिलीप नरवडे, डॉ. शरद शिंदे, सुनील हांडगे यांच्याकडे आहे.

भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार पंकज शिरसाठ आणि प्रो कबड्डी स्पर्धे्मुळे वलयांकित खेळाडू महेंद्र राजपूत हे या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहणार आहेत. दररोज होणाऱ्या सामन्यांसाठी बक्षिसे दिली जात असून उत्कृष्ठ पकड, चढाई, अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येत असल्याने खेळाडुंमध्ये जोश असल्याची माहिती संयोजक मोहन गायकवाड यांनी दिली.