टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादानंतर अनिल कुंबळे यानं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट सल्लागार समितीचं काम खूप वाढलं आहे. या समितीला लवकरात लवकर कुंबळेच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करायची आहे. त्यामुळंच पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी पर्यायी नावांचा विचार केला जात आहे. तसंच प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. त्यात आता विराटची पसंती असलेल्या रवी शास्त्रींचे नाव पुढे येत आहे. त्याचवेळी रवी शास्त्रींनी बीसीसीआयसमोर अट ठेवली आहे, असं समजतं. बीसीसीआय आणि सल्लागार समितीनं ही अट मान्य केली तर शास्त्रींचा प्रशिक्षकपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर आपण केवळ बीसीसीआय आणि सचिन, गांगुली आणि लक्ष्मणचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीसोबतच चर्चा करू, अशी भूमिका रवी शास्त्री यांनी घेतली आहे. टीम इंडियाचा माजी व्यवस्थापक असलेल्या रवी शास्त्री यांनी ‘क्रिकेटनेक्स्ट’च्या हवाल्यानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशिक्षकपदी निवड करण्याची हमी दिली तरच अर्ज करेन. प्रशिक्षकपदासाठी रांगेत उभं राहण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

शास्त्रींचं नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आल्यानं या पदासाठी अर्ज करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश यांचा मार्ग खडतर झाला आहे, असं बोललं जात आहे. टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक असलेल्या रवी शास्त्रींना या पदासाठी अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे नवीन प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी असलेली सल्लागार समिती या निवड प्रक्रियेसाठी घाई करणार नसल्याचे कळते. नवीन प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा वेस्टइंडिज दौऱ्यानंतर आणि श्रीलंकेसोबतच्या मालिकेपूर्वी होणार असल्याचे बीसीसीआयनं या आधीच स्पष्ट केलं आहे.