उत्तेजकाच्या घटना रोखण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन मिळाव़े, या दृष्टीने २४ तास मदत मिळेल अशी सेवा सुरू करावी, अशी सूचना मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी केली आहे.

विजयकुमार मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय क्रीडा परिषदेतर्फे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गोपीचंद म्हणाले, ‘‘अनेक वेळा सर्दी व खोकला, पोटदुखी यांसारख्या सामान्य आजारावर औषधे वैद्यकीय तज्ज्ञांतर्फे सुचविली जात असतात. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीतर्फे प्रत्येक वर्षी उत्तेजकांची माहिती दिली जाते. मात्र हा बदल जर या वैद्यकीय तज्ज्ञास माहीत नसेल तर खेळाडू उत्तेजकाच्या कचाटय़ात सापडला जातो. अशा घटना टाळण्यासाठी २४ तास मदत मिळेल अशी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.’’

‘‘उत्तेजक चाचणी घेणाऱ्यांची संख्या अत्यंत अल्प असल्यामुळे खेळाडूंचा खूप वेळ वाया जातो. साहजिकच अशा वेळी खेळाडूंच्या लघवी व रक्ताचे नमुने बदलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चाचण्यांच्या वेळी भरपूर मनुष्यबळ ठेवले तर खेळाडूंची योग्य रीतीने चाचणी घेतली जाईल,’’ असे माजी धावपटू व प्रशिक्षक पी. टी. उषा यांनी सांगितले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेटी श्रीनिवास म्हणाले, ‘‘उत्तेजकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक खेळाच्या राष्ट्रीय संघटनेने स्वतंत्र पदाधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. उत्तेजकाच्या वेळी अदलाबदलाचे गोंधळ होऊ नये या दृष्टीने प्राधिकरणातर्फे उत्तेजकाचे नमुने घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या जात असतात. उत्तेजकाच्या घटना या केवळ संबंधित खेळाडू नव्हे तर देशाचीही प्रतिमा डागळणाऱ्या घटना असतात. त्यामुळे असे कटू प्रसंग टाळण्यासाठी खेळाडू व संघटकांसह सर्वाचीच जबाबदारी आहे.’’