आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळवला आहे. प्रदीप मोर, रुपिंदरपाल सिंग आणि रमणदीप सिंग यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना नेहमी प्रमाणेच उत्कंठावर्धक झाला. पेनल्टी कॉर्नर मिळाल्यावर पाकिस्तानने आक्रमणाची धार तीव्र केली होती. मात्र पाकिस्तानला या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करु न दिल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला. यानंतर भारताने या सामन्यावर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या सत्रात भारताने खेळ उंचावत पाकिस्तानला मागे टाकले. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. सामना बरोबरीत आणण्यासाठी पाकिस्तानने जंगजंग पछाडले. पाकिस्तानने अनेकदा भारतीय संघाचा बचाव भेदला. पाकिस्तानच्या दमदार आक्रमणामुळे भारत काही वेळ या सामन्यात पिछाडीवर होता.

यानंतर पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करत भारताने २-२ अशी बरोबरी साधली. रुपिंदरपाल सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यानंतर भारताने पुन्हा एकदा आक्रमण करत पाकिस्तानचा बचाव भेदला. रमणदीप सिंगने भारताकडून तिसरा आणि निर्णायक गोल केला. या गोलमुळे भारताने पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळवला.

या सामन्यानंतर भारताचे ७ गुण झाले आहेत, तर पाकिस्तानच्या खात्यात ३ गुण आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे गटात अव्वल स्थान मिळवण्याची संधी भारतासमोर आहे.